टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. सोनाली यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी गोवा पोलिसांनी त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर वासी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक जिवा दळवी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. सोनाली फोगट यांचा २२ ऑगस्ट रोजी गोव्यात मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं सांगितलं जात होतं. परंतु आता ही हत्या असल्याचं समोर आलंय.
सोनालीच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर कुटुंबीय शवविच्छेदनासाठी तयार झाले होते. सोमवारी सोनाली फोगट यांचा पीए सुधीर सांगवान आणि तिचा मित्र सुखविंदर वासी हे गोव्यात आल्यावर तिच्यासोबत होते. सोनाली फोगट यांना संशयास्पदरित्या हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, सोनालींचा भाऊ रिंकू ढाका यांनी बुधवारी अंजुना पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. ढाका यांनी तक्रारीत आपल्या बहिणीवर तिचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला. सोनालीने मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांची आई, बहीण आणि भावाशी संवाद साधला होता. यावेळी सोनालीने पीएची तक्रार केली होती. सोनालीच्या पीएने जेवणात ड्रग्ज टाकून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रिंकूने केला आहे.
हेही वाचा – सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”
“सांगवानने तिला अंमली पदार्थ घालून जेवण दिले, तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडीओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्याने सोनालीला तिची राजकीय आणि अभिनय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आणि तिचे फोन, मालमत्तेचे रेकॉर्ड, एटीएम कार्ड आणि घराच्या चाव्याही गायब केल्या,” असं रिंकू ढाका यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
गुरुवारी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये फोगट यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.