समीर जावळे
Sonam Raghuvanshi तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीचा हसीन दिलरुबा आठवतोय? नवऱ्याच्या हत्येच्या आरोपांवरुन पत्नीला अटक केली जाते. रानी कश्यप (तापसी पन्नू), रिषभ (विक्रांत मेस्सी) या दोघांचं लग्न होतं. अचानक रानीच्या आयुष्यात नीलची एंट्री होते. मग नवऱ्याची हत्या आणि शेवटी उलगडणारं महत्त्वाचं रहस्य. हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि लोकांना आवडलाही होता. रोमान्स, ड्रामा, अॅक्शन, रहस्य हे सगळं यात होतं. आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे नुकतंच घडलेलं राजा रघुवंशीचं हत्या प्रकरण.
नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घ्या
११ मे २०२५ या दिवशी लग्न झालेलं जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम हे दोघंही २० तारखेला मधुचंद्रासाठी निघतात. बंगळुरुला पोहचतात. त्यानंतर गुवाहाटीला जातात आणि कामाख्या मंदिराचं दर्शन घेतात. तिथले फोटोही शेअर करतात. पण २३ मे उजाडतो दोघंही शिलाँगला जाणार हे आधीच कुटुंबाला त्यांनी सांगितलेलं असतं. २३ तारखेला सोनम सासूला एक फोन करते. त्यानंतर राजा आणि सोनम दोघांचेही फोन स्विच ऑफ मग काय पहिला दिवस जातो, दुसरा जातो. घरातल्यांची काळजी वाढू लागते म्हणून दोघांच्याही घरातले सदस्य शिलाँगला जातात. शोध काही लागत नाही. मध्य प्रदेश सरकारकडून मेघालय सरकारला तपास जलद गतीने करा म्हणून विनंतीही केली जाते आणि २ जून उजाडतो तेव्हा मिळतो राजा रघुवंशीचा मृतदेह. तरीही सोनम गायब असते. सोनमचं गायब होणं आणि आज सापडणं, नवऱ्याच्या हत्येत तिचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर हसीन दिलरुबा हा चित्रपट आणि ही घटना यांच्यातली साम्यस्थळं आढळतात.
सिनेमा आणि वास्तवातली साम्यस्थळं काय?
हसीन दिलरुबा या सिनेमात रानी कश्यपवर (तापसी पन्नू) पोलीस तिच्या नवऱ्याच्या हत्येचा आळ घेतात आणि तिची चौकशी सुरु करतात. रानी सगळ्या प्रकारच्या चौकशीला अगदी लाय डिटेक्टर टेस्टलाही सामोरी जाते. सगळ्यातून सहीसलामत सुटते. वास्तवात जी घटना घडली आहे त्यात सोनम रघुवंशीनेच बॉयफ्रेंडसाठी पतीची हत्या लग्नानंतर मधुचंद्राला गेल्यावर केली आहे असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. मेघालय पोलिसांनी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडसह आणखी दोघांना पती राजा रघुवंशीची हत्या करण्याचं काँट्रॅक्ट दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तापसीच्या सिनेमातही बॉयफ्रेंडचा अँगल होता तसाच तो वास्तवातल्या घटनेतही आहे. त्यामुळे सिनेमा आणि वास्तवातली घटना यात ही साम्यस्थळं आढळतात. सिनेमातला क्लायमॅक्स असा आहे की रानी कश्यपच्या म्हणजेच तापसीच्या बॉयफ्रेंडची हत्या झाली आहे. पतीला तिने वाचवलं आहे पण हत्या पतीची झाल्याचं भासवलं आहे. तरीही ती सगळ्या चौकशीच्या कचाट्यातून सुटते. मात्र वास्तवात जी घटना घडली आहे त्यात बॉयफ्रेंड राज कुशवाहाच्या मदतीने सोनमने तिचा पती राजा रघुवंशीला संपवलंय. पोलीस सोनमच हत्येमागे आहे असा दावा करत आहेत. तिच्या चौकशीतून सत्य समोर येईलच.

राजा रघुवंशीचा मृतदेह कसा मिळाला? ओळख कशी पटली?
राजा आणि सोनम बेपत्ता झाल्यापासून ११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांच्या ड्रोनला दिसला. हा मृतदेह १५० फूट खोल दरीत होता. तसंच मृतदेह इतका सडला होता की त्याची ओळख पटवणं कठीण होतं. अखेर या मृतदेहाच्या हातावर राजा हे नाव गोंदलेलं होतं त्यावरुन त्याच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. २ जून उजाडला तरीही सोनम बेपत्ताच होती. सोनम कुठे आहे? राजाचा मृत्यू कसा झाला? हे सगळे प्रश्न २ जूनला म्हणजेच राजाचा मृतदेह मिळाल्यावरही कायम राहिले होते. पोलिसांना राजाचा मृतदेह इस्ट खासी हिल्स भागात सापडला. २३ मे रोजी हे जोडपं बेपत्ता झाल्यापासून पोलीस, एसडीआरएफ, गिर्यारोहण क्लबतर्फे या दोघांचा शोध सुरु होता. अजूनही राजाच्या पत्नीचा शोध सुरु आहे. ज्या ठिकाणी ही शोध मोहीम राबवली जात होती त्या ठिकाणी वातावरणात सारखे बदल होत होते. पाऊस पडणं, उन पडणं, पुन्हा पाऊस पडणं या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. २ जूनला पोलिसांच्या ड्रोनने १५० फूट खोल दरीत एक मृतदेह आहे हे शोधलं. हा भाग दुर्गम असल्याने या ठिकाणी मृतदेह काढण्यासाठीही बराच वेळ लागला. २ जूनच्या दिवशी दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान हा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला.
सोनम रघुवंशी कशी सापडली?
दोन आठवड्यांपासून इंदूरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची आणि नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सोनम व पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यामुळे त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पण सोनम रघुवंशी मात्र बेपत्ता होती. अखेर सोनम उत्तर प्रदेशच्या गाझिपूरमध्ये सोनम एका ढाब्यावर विमनस्क अवस्थेत आढळून आली असून तिनंच तिच्या पतीची भाडोत्री हल्लेखोरांकरवी हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं आहे.
सोनम बेवफा हैचा ट्रेंड
सोनमला पोलिसांनी अटक केल्यानंतर आणि राजाच्य हत्येमागे ती असल्याचा दावा केल्यानंतर सोनम बेवफा है चा ट्रेंडही एक्स या समाजमाध्यमावर सुरु झाला आहे. शिवाय Honeymoon हा शब्द, Indore Couple हा शब्द हे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. सोनमला लग्न करायचं नव्हतं तर तिने राजाला होकार का दिला? त्याचा नाहक बळी का घेतला? असे प्रश्नही नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत. इतकंच नाही तर अरेंज मॅरेज करत असाल तर हजारवेळा विचार करा असाही सल्ला अनेकजण सोनमचा फोटो पोस्ट करुन देत आहेत.

चित्रपटात घडतं तसं वास्तवात घडत नाही, वास्तव कायमच क्रूर असतं
‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात एक पत्नी तिच्या पतीला वाचवण्यासाठी सगळा बनाव रचते. त्यातून सहीसलामत सुटते. तिच्याकडून लग्नानंतर एक चूक घडलेली असते. पण ही चूक रानी कश्यप (तापसी) सुधारते. शेवट गोड होतो. वास्तवात मात्र असं घडत नाही. वास्तवात जे घडलंय ते अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारं आहे. लग्नानंतर पती पत्नी मधुचंद्रासाठी जातात आणि तिथेच होतो पतीचा अत्यंत क्रूर शेवट. राजा रघुवंशीचा दरीत कुजलेला मृतदेह सापडला आणि त्यानंतर सात दिवस सोनम बेपत्ता होती जी सापडल्यानंतर आता राजाच्या हत्येमागे तिचाच हात असल्याचं समोर येतं आहे. बॉयफ्रेंडसाठी पतीला मारल्याची ही घटना नक्कीच मन सून्न करणारी ठरली आहे यात काहीही शंकाच नाही. सोनम निर्दोष आहे ती असं करु शकत नाही असे तिच्या घरातले म्हणत आहेत. तर सोनमने गुन्हा केला असेल तर तिला शिक्षा झाली पाहिजे असं राजाच्या कुटुंबाने म्हटलं आहे. पती पत्नीचं नातं हे असं नातं असतं जे दोन कुटुंबं जोडतं. राजा सोनम प्रकरणाला पोलिसांच्या दाव्यामुळे वेगळंच वळण लागलं आहे. नेमकं यात काय घडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तूर्तास तरी ही घटना ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाची आठवण करणारी ठरली आहे यात शंका नाही. त्यामुळे सोनम नावाची ‘हसीन दिलरुबा’ असं या घटनेकडे पाहिलं तर वावगं ठरणार नाही.