Raja Raghuvanshi Murder Case: इंदूर येथील राजा रघुवंशी याची काही दिवसांपूर्वी मेघालयात हनीमूनसाठी गेल्यानंतर हत्या झाली होती. या हत्येमागे त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि कथित प्रियकर राज कुशवाह यांचा हात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सोनम, तिचा प्रियकर आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, राजाची हत्या कशी झाली आणि गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्याची पत्नी सोनम रघुवंशी मेघालयातून कशी पळून गेली, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी २३ मे रोजी, राज्याच्या हत्येनंतर मेघालयातून सोनम कशी पळाली आणि ९ जूनपर्यंत ती कुठे कुठे गेली होती, याचा खुलासा केला आहे.
सोनम रघुवंशी मेघालयातून कशी पळाली?
२३ मे रोजी, ज्या दिवशी हनीमूनसाठी गेलेले सोनम आणि राजा हे जोडपे बेपत्ता झाले होते, त्याच दिवशी सोनमने मारेकऱ्यांना सुपारी देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सोनम शिलाँगहून गुवाहाटीला गाडीने गेली आणि नंतर ट्रेनने इंदूरला परतली, असे हिंदुस्तान टाइम्सने आधी वृत्त दिले होते. इंदूर पोलिसांनी सांगितले की, मेघालय पोलिसांनी त्यांना ही माहिती दिली आहे.
गाझीपूरमध्ये अटक
पुढे, २८ मे रोजी सोनम इंदूरहून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला रवाना झाली, जिथे तिला सोमवार, ९ जून रोजी अटक करण्यात आली. सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह याचे गाझीपूर हे गाव आहे. त्यानेच तिला राजाच्या हत्येचा कट आखण्यात आणि हत्या करण्यात मदत केली होती, असा आरोप आहे.
प्रियकराबरोबर इंदूरमध्ये मुक्काम
दरम्यान, सोनम राजाच्या हत्येनंतर इंदूरमध्ये परतली तेव्हा ती राज कुशवाहासोबत एका फ्लॅटमध्ये राहिली होती. इंदूर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, “सोनम इंदूरला परतली तेव्हा राज कुशवाहाने तिला घेऊन येण्यासाठी कॅब पाठवली होती. त्यानंतर ती देवास नाका परिसरातील एका फ्लॅटवर गेली. पुढे, उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील राज कुशवाहाच्या गावी जाण्यापूर्वी ती राजसोबत २४ तास त्या फ्लॅटमध्ये राहिली होती.”
दरम्यान राजा रघुवंशीच्या हत्येनंतर तिन्ही मारेकरीही इंदूरला गेले होते. राजा रघुवंशी यांची हत्या केल्यानंतर आरोपी सोहराहून गुवाहाटीला टॅक्सीने गेले आणि नंतर इंदूरला ट्रेनने पोहचले, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.