Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. ११ मे रोजी लग्न झाल्यानंतर २० मे रोजी हे दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. मात्र २३ तारखेला राजाची हत्या करण्यात आली. या हत्येसाठी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडशी संपर्क साधून तिघांना शिलाँग या ठिकाणी बोलवलं. त्यानंतर तिने या तिघांना राजा रघुवंशीची हत्या करायला लावली. या घटनेची चर्चा देशभरात सुरु आहे. दरम्यान राजा रघुवंशीला ठार मारण्यात हे तिघं अपयशी ठरले असते तर सोनमकडे प्लान बी तयार होता अशी माहिती आता समोर आली आहे.
१८ मे रोजी आखला होता राजाच्या हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम रघुवंशीने लग्नानंतर सात दिवसांनी म्हणजेच १८ मे रोजी राजाच्या हत्येचा कट रचला होता. तिचा बॉयफ्रेंड राजा कुशवाहा याच्याशी ती सातत्याने संपर्कात होती. लग्नानंतर चार दिवसांनी म्हणजेच १५ मे च्या दिवशी ती तिच्या माहेरी आली होती. तिने त्यावेळी राज कुशवाहाशी संपर्क केला होता. आम्ही आधी बंगळुरु आणि त्यानंतर गुवाहाटीला जाऊ असं तिने राज कुशवाहाला सांगितलं होतं अशीही माहिती आता समोर आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. एवढंच नाही तर सोनमला राजा रघुवंशीशी लग्नानंतर येणारे शरीर संबंध पुढे ढकलायचे होते. त्यामुळे तिने १५ मे रोजी माहेरी येऊन पुढचा कट आखला आणि काय करणार आहोत हे राज कुशवाहा (सोनमचा कथित बॉयफ्रेंड) याला सांगितलं. मेघालय या ठिकाणी हे दोघं २२ मे रोजी गेले होते. त्यानंतर २३ मे रोजी त्यांनी त्यांचं होम स्टे सोडलं होतं. दरम्यान सोनमकडे प्लान बी तयार होता.

सोनम रघुवंशीचा प्लान बी काय?
सोनम रघुवंशीकडे राजाच्या हत्येचा प्लान बी तयार होता. “आनंद, विशाल आणि आकाश या तिघांना जमलं नाही तर मी राजाला खाली ढकलून देईन. फोटो काढण्याच्या निमित्ताने त्याला खाली ढकलेन.” असं सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला सांगितलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सोनम रघुवंशी मेघालयातून कशी पळाली?
२३ मे रोजी सोनम आणि राजा हे जोडपे बेपत्ता झाले होते, त्याच दिवशी सोनमने मारेकऱ्यांना सुपारी देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सोनम शिलाँगहून गुवाहाटीला गाडीने गेली आणि नंतर ट्रेनने इंदूरला परतली. इंदूर पोलिसांनी सांगितले की, मेघालय पोलिसांनी त्यांना ही माहिती दिली आहे. सोनम राजाच्या हत्येनंतर इंदूरमध्ये परतली तेव्हा ती राज कुशवाहासोबत एका फ्लॅटमध्ये राहिली होती. इंदूर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, “सोनम इंदूरला परतली तेव्हा राज कुशवाहाने तिला घेऊन येण्यासाठी कॅब पाठवली होती. त्यानंतर ती देवास नाका परिसरातील एका फ्लॅटवर गेली. पुढे, उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील राज कुशवाहाच्या गावी जाण्यापूर्वी ती राजसोबत २४ तास त्या फ्लॅटमध्ये राहिली होती.” अशीही माहिती त्यांनी दिली आहे.