Sonam Raghuvanshi Honeymoon Murder: पुण्यातील केतन अग्रवाल हत्येचे प्रकरण आणि त्यातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांचे प्रकरण चर्चेत असतानाच वर्षभरापूर्वी घडलेल्या हनिमून मर्डरची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. सोनम रघुवंशीने मेघालयमध्ये तिचा पती राजा रघुवशींची हत्या केली होती. या हनिमून मर्डर प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यात सोनम रघुवंशी आरोपी क्र. १ असतानाही तिला न्यायालयाने जामीन दिला. यामुळे अनेकांना धक्का बसला. पोलिसांनी अटकेचे कागदपत्र तयार करताना त्यात अक्षम्य चूक केल्याचे आता समोर आले आहे.
सोनम रघुवंशीच्या अटकेच्या कागदपत्रात अटकेचे कारण हत्या नसून वेगळेच देण्यात आले. सोनम लष्करातून पळून गेल्याचे आणि तिने भारताबाहेर गुन्हा केल्याचे कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. मेघालय उच्च न्यायालयाने सोनम रघुवंशीला जामीन मंजूर करत असताना पोलिसांनी दाखल केलेल्या दस्तऐवजाचे वाभाडे काढले आहेत. डोक्याचा भाग न वापरता हे कागदपत्र तयार केले असल्याची टीका केली. तसेच राज्य सरकारने सोनमचा जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिकाही फेटाळून लावली.
जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती डब्ल्यू डिएंगडोह यांनी सांगितले की, ९ जून २०२५ गाझीपूर येथील वन स्टॉप सेंटरने तयार केलेले अटकेचे कागदपत्र तपासण्यात आले. त्यावर सोनमची स्वाक्षरी आहे. हे कागदपत्र तयार करताना डोक्याचा भाग वापरलेला नाही. यात खटल्याच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आरोपीवर कोणते विशिष्ट आरोप आहेत, याची कोणतीही माहिती त्यात नाही.
न्यायमूर्ती डिएंगडोह यांनी या कागदपत्रातील काही मजकूर वाचून दाखवला. ज्यात लिहिले आहे, “केंद्रीय सशस्त्र दलातून तुम्ही पळून गेल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.” तर दुसऱ्या एका उताऱ्यात लिहिले आहे, “तुम्ही विदेशात गुन्हा केल्याचा तुमच्यावर आरोप आहे.” तर तिसरा उल्लेख तर अतिशय हास्यास्पद आहे. यात लिहिले, “तुम्ही तुरुंगातून सुटल्यानंतर तुमच्या निवासस्थानाची किंवा पत्त्यामध्ये केलेल्या बदलाची माहिती न दिल्याचा तुमच्यावर आरोप आहे.”

कलम लिहिण्यातही केली चूक
न्यायालयाने शासनाच्या युक्तिवादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०३ (१) म्हणजेच हत्येसाठी शिक्षा या कलमाच्या ऐवजी कलम ४०३ (१) असा उल्लेख केला होता. न्यायालयाने म्हटले की, गुन्ह्यानंतरच्या डायरीतील नोंदीमध्ये अनेक ठिकाणी ही चूक आढळून येत आहे. यावरून स्पष्टपणे अधिकाऱ्यांनी चूक केल्याचे दिसून येते. आरोपीच्या विरोधात खटला उभा करण्यासाठी आवश्यक असलेला पायाच कच्चा असल्यामुळे पुढील प्रक्रियेत सुधारणा करण्याचे प्रयत्न अपयशी ठरतात.
प्रकरण काय आहे?
इंदूरमधील २९ वर्षीय व्यावसायिक राजा रघुवंशीचा ११ मे २०२५ रोजी सोनमशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही मेघालयमधील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेले होते. मात्र २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. राजा रघुवंशीचा मृतदेह एका दरीत आढळून आला होता. या हत्येप्रकरणी सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली.
सोनम रघुवंशीला ९ जून २०२५ रोजी गाझीपूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शिलाँग येथे ती सुमारे १० महिने न्यायालयीन कोठडीत होती. २७ एप्रिल रोजी तिला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर मेघालय उच्च न्यायालयानेही हा जामीन कायम ठेवला.
