Sonam Raghuvanshi Lover Slapped At Indore Airport Video: मध्य प्रदेशातील इंदूरच्या राजा रघुवंशी याची हनिमूनसाठी मेघालयला गेल्यानंतर पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनम रघुवंशी आणि प्रियकर राज कुशवाहसह इतर तिघांना अटक केली आहे.

मंगळवारी रात्री, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अटक केल्यानंतर मेघालय पोलीस आरोपींना इंदूरहून शिलाँगला घेऊन जात असताना, इंदूर विमानतळावर चार आरोपींपैकी एका आरोपीला एका प्रवाशाने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. मेघालय पोलिसांचे पथक अटक केलेल्या चौघांसह विमानतळावर प्रवेश करत असताना ही घटना घडली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलीस आरोपींसह विमानतळावर प्रवेश करत असताना, सामान घेऊन वाट पाहणाऱ्या एका प्रवाशाने त्यांना पाहिले आणि आरोपीच्या कानशिलात लगावली. देशाल हदरवणाऱ्या या हत्याकांडामुळे सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याचबरोबर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

दरम्यान चारही आरोपींनी मास्क घातले असल्याने कोणाला कानशिलात लागवली हे अद्याप कळू शकले नाही. आरोपींना कानशिलात लगावणारे सुशील लखवानी म्हणाले की, या घटनेमुळे ते संतापले आहेत.

“मी त्याला (राजा रघुवंशी प्रकरणातील एका आरोपीला) मारले आहे कारण मला इंदूरच्या एका रहिवाशाची हत्या झाल्याचा राग आहे. आरोपींना फाशी देण्यात यावी. पत्नीने पूर्ण नियोजन करून पतीची हत्या केली,” असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

इंदूरचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, मेघालय पोलिसांचे १२ अधिकाऱ्यारे पथकाने राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या चार आरोपींना शिलाँगला घेऊन गेले आहे. यासाठी त्यांना इंदूर न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, २३ मे रोजी मेघालयात राजा रघुवंशीची हत्या झाल्यानंतर, यातील मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी इंदूरला आल्याची माहिती मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्हाला माहिती मिळाली आहे की, सोनम रघुवंशी पतीच्या हत्येनंतर मेघालयातून इंदूरला आली होती आणि २५ ते २७ मे दरम्यान ती देवास नाका परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहिली होती. पण, मेघालय पोलिसच याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतील,” असे या अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.