Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनमनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने घडवून आणली असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. सोनमला ९ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझिपूरमधून अटकही करण्यात आली. दरम्यान या घटनेतील विविध पैलूही आता समोर येत आहेत. सोनमने हनिमूनच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहला मेसेज केला होता अशी माहिती आता समोर येते आहे.
सोनम आणि राजाचा विवाह ११ मे रोजी झाला
सोनम आणि राजाचा विवाह ११ मे रोजी झाला होता. सोनम आणि राजा २० मे रोजी मधुचंद्रासाठी निघाले. आधी ते दोघंही बंगळुरुला गेले. त्यानंतर गुवाहाटी या ठिकाणी जाऊन त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. तिथून ते शिलाँगला गेले. २३ मे रोजी या जोडप्याचा संपर्क तुटला. त्यानंतर हे दोघंही बेपत्ता झाले होते. मात्र २ जून रोजी राजाचा मृतदेह शिलाँग येथील पर्वतरांगांमध्ये १५० फूट खोल दरीत आढळून आला. त्याच्या मृतदेहावर वार झाले होते. त्यावरुनच ही हत्या असावी असा संशय पोलिसांना आला. त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी मर्डर वेपनही मिळालं.
सोनमने राज कुशवाहाला काय मेसेज केला?
राजला केलेल्या मेसेजमध्ये सोनमने म्हटलं आहे की राजा रघुवंशी तिच्याशी जवळीक साधतो आहे, प्रेम करतो आहे हे मला मुळीच आवडत नाही. सोनमने असा टेक्स्ट मेसेज तिचा प्रियकर राज कुशवाहाला केला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलंं आहे. राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दोघांमध्ये राजा रघुवंशीच्या हत्येच्या आधी या दोघांमध्ये अनेकदा फोनवर चर्चा झाल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज कुशवाहनंच सोनमच्या मदतीने राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला, मारेकऱ्यांना सुपारी दिली आणि शिलाँगमध्ये त्या दोघांच्या ठावठिकाण्याची माहिती मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेतले जे पैलू समोर येत आहेत त्यानुसार राजला सोनमने मेसेज केला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोतिया यांनी पीटीआयला सांगितलं की मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात राज कुशवाह, विशाल चौहान आणि आकाश राजपूत या तिघांनाही अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयाने ट्रान्झिट कोठडीत सात दिवसांसाठी केली आहे. राजाचा मृतदेह २ जूनला मिळाला. तरीही सोनम बेपत्ता होती. तिला ९ तारखेला अटक करण्यात आली. दरम्यान सोनमने राजाची हत्या करायची हे १८ मे रोजी म्हणजेच लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ठरवलं होतं तसा कटही तिने आखला होता असं राजेश दंडोतिया यांनी सांगितलं.