राजा रघुवंशीच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला म्हणजेच त्याच्या पत्नीला जामीन मिळाला आहे. इंदूर या ठिकाणी राहणारं हे जोडपं होतं. हे दोघंही त्यांच्या लग्नानंतर आधी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर गुवाहाटीवरुन ते दोघंही शिलाँगला गेले. सुरुवातीला राजा आणि सोनम दोघंही बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र नंतर राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला आणि सोनमच्या प्रियकराला आणि त्याच्या साथीदारांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर सोनमही समोर आली. या प्रकरणात सोनम मुख्य आरोपी आहे. पती राजा रघुवंशीची हत्या घडवून आणणे, हत्येचा कट रचणे असे गंभीर गुन्हे तिच्यावर होते. आता याच सोनम रघुवंशीला जामीन मंजूर झाला आहे.

सोनमच्या कुटुंबाने दिली जामीन मिळाल्याची माहिती

सोनमला जामीन मिळाला असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तसंच राजा रघुवंशी यांच्या मोठ्या भावानेही हे वृत्त दिलं आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पीटीआय या वृत्तसंस्थेने सोनम रघुवंशीला जामीन मिळाल्याचं वृत्त दिलं आहे.

Raja Raghuvanshi Murder Case
राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी समोर आली तेव्हा सोनम आणि राजाचा हा फोटो व्हायरल झाला होता. (फोटो-लोकसत्ता )

प्रियकराशी लग्न न झाल्याने सोनमने घडवून आणली राजाची हत्या

सोनमने राजाची हत्या घडवून आणली, या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. मागील वर्षी म्हणजेच २०२५ मधल्या मे महिन्यात ही घटना घडली होती. सोनमचे राज कुशवाहाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळेच तिने त्याच्यासह कट रचून राजा रघुवंशीला ठार केलं. आपण जाणून घेऊ काय होतं राजा रघुवंशीच्या हत्याकांडाचं प्रकरण

२३ मे २०२५ च्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

२३ मे रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या जबाबामुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली. या टुरिस्ट गाईडने दिलेल्या माहितीनुसार सोनम या चार जणांच्या मागून चालत होती तर तिच्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता.

राजाची हत्या सोनमने केलेल्या इशाऱ्यानंतरच

२३ मे २०२५ च्या दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला. मी खूपच दमले आहे आणि उपास ठेवला आहे असं तिने सासूला म्हणजेच राजाच्या आईला सांगिलं. त्यावेळी उमा रघुवंशी राजाशीही बोलल्या. राजाशी हा आपला शेवटचा संवाद आहे हे तेव्हा त्यांना मुळीच वाटलं नव्हतं. साधारण आणखी अर्ध्या तासाने दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हे पाचही जण मावलखियाट या ठिकाणाहून वेई सावदोंग धबधब्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी सोनलने या तिघांना इशारा केला ज्यानंतर राजाच्या डोक्यावर चाकू हल्ला करण्यात आला. राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित होती. राजाच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या मोबाइलवरुन सात जन्मो का साथ असं लिहून एक सोशल मीडिया पोस्ट केली. दुपारी २.३० च्या दरम्यान राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. असा घटनाक्रम राजाच्या मृत्यू आधी घडला होता.

Raja Raghuvanshi Murder Case
काय आहे राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण? (फोटो-लोकसत्ता)

राजा रघुवंशीच्या हत्येनंतर गायब झालेली सोनम पोलिसांना कशी सापडली?

इस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सैय्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे २०२५ रोजी राजा रघुवंशीची सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी सुपारी किलर्सकडून हत्या घडवून आणली. राजाचा मृतदेह २ जून २०२५ रोजी पोलिसांना आढळून आला. मात्र सोनम रघुवंशी तरीही बेपत्ता होती. सुरुवातीला पोलिसांना हे लूट आणि अपहरण याचं प्रकरण वाटलं होतं. मात्र पोलिसांनी जेव्हा सोनम रघुवंशीचे फोन रेकॉर्ड तपासले तेव्हा राज कुशवाहाशी ती सातत्याने संपर्कात होती हे कळलं. पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली. त्यानंतर ८ जून रोजी सोनम पोलिसांना शरण आली होती. तिला त्यानंतर अटक करण्यात आली. मात्र आज शिलाँग येथील न्यायालयाने सोनमला जामीन मंजूर केला आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येचा घटनाक्रम कसा होता? विशेष तपास पथकाने दिलेली माहिती काय होती?

आकाश, आनंद आणि विकास हे इंदूरहून शिलाँग येथे गेले. उघड होऊ नये यासाठी त्यांनी वेगवेगळी वाहने वापरली.

२३ मे रोजी सोनम आणि राजा हे चेरापुंजी येथे ट्रेकसाठी बाहेर पडले, त्यांच्याबरोबर तीन आरोपी देखील होते.

या सगळ्यांनी डबल-डेकर लिव्हिंग रूट ब्रीजकडे जाण्यासाठी पर्यटक वापरतात तो रस्ता सोडला आणि कमी माहिती असलेला आणि ओबडधोबड वाट निवडली.

स्थानिक गाईड अल्बर्ट पडे (Albert Pde) याने त्यांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाहिले, ते सर्व जण हिंदीत बोलत होते आणि त्यांनी आम्हाला गाईड नको असे त्याला सांगितले.

निर्जन स्थळी पोहचल्यावर सोनम थोडी मागे राहिली आणि त्याला ठार करा असे ओरडली, यानंतर विकी ठाकूर याने राजा याच्यावर पहिला वार केला.

त्यानंतर इतर दोन आरोपी सहभागी झाले आणि त्यांनी राजा याच्या डोक्यावर आणि अंगावर धारदार शस्त्राने वार केले.

राजा रघुवंशीचा मृतदेह ढकलून नेऊन तो दरीत ढकलण्यात आला, मिळालेल्या माहितीनुसार सोनम हे सर्व करवून घेत होती.

राजा आणि सोनमचं लग्न ते सोनमची अटक काय घडलं?

  • ११ मे २०२५ राजा आणि सोनम यांचे लग्न झाले.
  • २१ मे २०२५ हे जोडपे शिलाँग येथे दाखल झाले आणि बालाजी गेस्ट हाऊसमध्ये पोहचले.
  • २२ मे २०२५ त्यांनी एक स्कूटी भाड्याने घेतली आणि ते सोहरा (चेरापुंजी) येथे गेले.
  • २३ मे २०२५ जोडप्यांने ट्रेकला सुरूवात केली, ज्यादरम्यान कथित राजा याची हत्या करण्यात आली.
  • २४ मे २०२५ सोहरारिम येथे बेवारस स्कूटी आढळून आली.
  • २ जून २०२५ राजाचा मृतदेह आढळून आला.
  • ७ जून २०२५ पोलीसांनी तीन आरोपींना मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून अटक केली.
  • ८ जून २०२५ सोनम यूपीतील गाझीपूर येथे पोलिसांना शरण आली.