Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर शरण आल्यानंतर या प्रकरणातले अनेक नवनवे खुलासे पोलिसांकडून केले जात आहेत. त्यात सोनम रघुवंशीनं तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा गंभीर दावाही आहे. आता सोनमने लग्नानंतर सात दिवसातच राजाच्या हत्येचा कट रचला होता अशीही माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोतिया यांनी पीटीआयला सांगितलं की मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात राज कुशवाह, विशाल चौहान आणि आकाश राजपूत या तिघांनाही अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयाने ट्रान्झिट कोठडीत सात दिवसांसाठी केली आहे. राजाचा मृतदेह २ जूनला मिळाला. तरीही सोनम बेपत्ता होती. तिला ९ तारखेला अटक करण्यात आली. दरम्यान सोनमने राजाची हत्या करायची हे १८ मे रोजी म्हणजेच लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ठरवलं होतं तसा कटही तिने आखला होता असं राजेश दंडोतिया यांनी सांगितलं.
पोलीस अधिकारी राजेश दंडोतिया काय म्हणाले?
१) राजा रघुवंशीचा मृतदेह २ जून रोजी मिळाला. त्यानंतरही त्याची पत्नी सोनम बेपत्ता होती. तिने उत्तर प्रदेश पोलिसांच्या समोर ९ जूनला शरणागती पत्करली
२) सोनम आणि राज या दोघांचं अफेअर होतं. राजा रघुवंशीच्या हत्येचा कट सोनमने १८ मे रोजी म्हणजेच लग्न झाल्यानंतर सात दिवसांतच आखला होता. सोनम आणि राजा यांनी हा कट आखला होता, अशी माहिती राजेश दंडोतिया यांनी दिली.
३) राज कुशवाह हा सोनमच्या भावाच्या कंपनीत वितरणाचं काम पाहतो. त्याने तिघांना राजाची हत्या करण्याची सुपारी दिली. पोलिसांनी राज कुशवाह आणि चौहानला इंदूरहून अटक केली. तर आनंद कुमार आणि सागर यांनाही मध्य प्रदेशातील दुसऱ्या एका ठिकाणाहून अटक केली.
४) सोनमचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तेव्हा तिचा सहभाग हत्येत आहे हे पोलिसांना समजलं.
५) ज्यांना सुपारी देण्यात आली होती त्यांना सोनमने लाईव्ह लोकेशन पाठवण्याचं काम सोनमने केलं होतं असाही दावा पोलिसांनी केला.
६) मेघालयातील विशेष तपास समितीने म्हणजेच एसआयटीने हे सांगितलं की राजाच्या मृतदेहावर खुणा होत्या, तसंच धारदार शस्त्राने हल्ले केल्याच्या खुणा आहेत असंही सांगितलं.
७) राजाच्या आईने सांगितलं की हनिमूनला जाण्यापूर्वी सोनमने तिकिटं बुक करण्यासाठी राजाकडून ९ लाख रुपये घेतले होते. हॉटेलचं बुकिंग आणि तिकिटांचं बुकिंग सोनमने केलं होतं. तसंच हनिमूनला जाताना आपण दागिनेही घेऊन जाऊ असाही आग्रह सोनमने केला होता. ही माहिती पोलिसांनी दिली.

राजा आणि सोनमचा विवाह ११ मे रोजी झाला होता
राजा आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर हे दोघं २० मे रोजी हनिमूनला गेले होते. सुरुवातीला ते बंगळुरुला गेले. त्यानंतर गुवाहाटी या ठिकाणी जाऊन या दोघांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. तिथे या दोघांनी फोटोही काढले. २२ मे रोजी ते शिलाँगला गेले. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. त्यांनी भाडे तत्त्वावर घेतलेली स्कूटर आढळून आली होती. या दोघांचा शोध सुरु आहे.२ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. यानंतर सात दिवसांनी सोनम पोलिसांना शरण आली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.