लेह : ‘आपल्याला पोलिसांनी आपल्या संस्थेत स्थानबद्धतेत ठेवले आहे’, असा आरोप अभियंता, कल्पक संशोधक व प्रयोगशील शिक्षक सोनम वांगचुक यांनी केला. मात्र, हा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. खार्दुग ला येथे उणे ४० अंश सेल्सिअस तापमान असल्याने वांगचुक यांना पाच दिवसांचे उपोषण करण्यापासून फक्त रोखण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
‘थ्री इडियट्स’मध्ये अमीर खान यांनी साकारलेले प्रमुख पात्र वांगचुक यांच्यावर बेतलेले आहे. वांगचुक यांनी लडाखवासीयांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीपासून १८ हजार ३८० फूट उंच खार्दुग ला येथे उपोषण करण्याचे जाहीर केले होते. राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीची विस्तारित अंमलबजावणी, तसेच औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांच्या अनियंत्रित विस्तारापासून लडाखच्या पर्यावरणाचे संरक्षण करावे आदी वांगचुक यांच्या मागण्या आहेत.