केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये विद्यार्थी आणि तरुण आंदोलकांना पोलीस व निमलष्करी दलांच्या जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आंदोलकांनी मागे हटण्यास नकार देत जंतर-मंतरवर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, आंदोलनस्थळी तरुणांची गर्दी वाढू लागली आहे. आंदोलक आणि विरोधकांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

याच परिस्थितीत दिल्लीत बेमुदत उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पोहोचली आहे. वांगचुक यांच्या समर्थनासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये तेथील भारतीय समुदायाकडून मोठी निदर्शने केली जात आहेत.

न्यू यॉर्क ते लंडन; ‘या’ शहरांमध्ये आक्रमक पवित्रा

अमेरिकेतील ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने न्यू यॉर्कमधील ऐतिहासिक युनियन स्क्वेअर येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आणि कॅलिफोर्नियातील सॅन होजे शहरात सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी हातात फलक धरून वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी केली आहे.

अमेरिकेव्यतिरिक्त लंडनमधील भारतीय उच्चायोग आणि आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील भारतीय दूतावासाबाहेरही नागरिकांनी एकत्र येत मूक आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदवला.

“विद्यार्थ्यांना न्याय आणि सन्मान मिळावाच”

या आंदोलनानंतर ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “न्यू यॉर्क, लंडन, सॅन होजे किंवा डब्लिन असो, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय, पारदर्शकता आणि सन्मान मिळालाच पाहिजे. देशातील तरुण पिढीला त्यांच्या भविष्याची खात्री आणि प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे हवी आहेत. केंद्र सरकारने आता तरी आंदोलकांशी सकारात्मक संवाद साधून संपूर्ण प्रकाराची जबाबदारी स्वीकारायला हवी.”