Sonam Wangchuk CJP NEET Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर मौदानावर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन झाले. यावेळी सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण केल्याने आंदोलनाला वेगळी धार चढली. या आंदोलनानंतर अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण, आता आंदोलनाबाबत सोनम वांगचुक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “२० जुलै रोजी झालेल्या लाठीमारनंतर सीजेपीने आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता”, असा गौप्यस्फोट वांगचुक यांनी केला आहे.
२० जुलै कारवाईनंतर आंदोलकांचे मनोबल खचले – वांगचुक
पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे सोनम वांगचुक यांनी अलिकडेच प्रखर गुप्ता यांच्या पीजीएक्स पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये वांगचुक यांनी आंदोलनाबाबत विविध खुलासे केले आहेत. २० जुलै रोजी सीजेपीने काढलेल्या संसद चलो मार्चनंतर आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला तसेच, अश्रूधुरांचा देखील वापर करण्यात आला. दरम्यान, या कारवाईनंतर आंदोलकांचे मनोबल खचले होते, असा दावा वांगचुक यांनी केला आहे. “जंतर मंतर वरुन आंदोलकांना माघारी जाण्यासाठी संदेश तयार करण्यास मदत करावी”, अशी विनंती सीजेपीकडून करण्यात आली होती, असे वांगचुक म्हणाले.
आंदोलकांना संदेश देण्याची विनंती
“आता सगळे गेलेत, मंचाची देखील मोडतोड झालीय, आता काही आशा नाही उरली”, असे सीजेपीचे नेते २० तारखेनंतर म्हणत होते, असे वांगचुक यांनी सांगितले. थकव्यामुळे थोडी विश्रांती घ्यायचीय अशा आशयाचा संदेश आंदोलकांना देण्यात यावा असे सीजेपीकडून सांगितले जात होते, असा खुलासा वांगचुक यांनी केला. “जंतर मंतरवर थांबू नका, घरी जा आराम करा, उद्या पुढची दिशा ठरविण्याबाबत निर्णय घेऊ”, असा संदेश आंदोलकांना देण्याची विनंती केली जात होती. संदेश लिहण्यात आलाही होता पण, तो पोस्ट नाही केला, असे वांगचुक या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाले.
आंदोलन पुन्हा जोर धरणार नाही ही भावना
२० तारखेच्या कारवाईनंतर सीजेपी नेत्यांचे मनोबल खचले होते. “प्रत्येकाला असं वाटत होतं की जे काही एक किंवा दोन लाख लोक एकत्र आले होते, ते सर्व त्या रात्री माघारी परतले, आणि आता सर्वकाही समाप्त झालंय”, असे वांगचुक म्हणाले. आंदोलन आता पुन्हा गती घेऊ शकणार नाही अशी अनेकांची भावना झाली होती. दरम्यान, तरुण आंदोलक जंतर मंतरवर एकत्र आल्यानंतर आंदोलनात जीव आला, असे मत वांगचुक यांनी मांडले. कारवाईनंतर देखील आंदोलक येऊ लागल्याने सीजेपीचा आत्मविश्वास वाढल्याचे वांगचुक या पॉडकास्टमध्ये म्हणाले.
