पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे २१ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र, १८ जुलै रोजी सकाळी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय उपचारासाठी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.
दरम्यान, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. तसेच २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे. मात्र, २० जुलै रोजीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नियोजित संसदेवरील मोर्चाबाबत आता दिल्ली पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.
‘संसदेवरील मोर्चासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही, किंवा मोर्चासाठी परवानगी मागितलेली नाही’, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी करत दिली. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी आता काय करणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा (BNSS) च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं?
“कॉक्रोच जनता पार्टीद्वारे संसदेकडे प्रस्तावित मोर्चाबाबतच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस या निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करत आहेत की, अशा कोणत्याही मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नाही किंवा देण्यातही आलेली नाही. नवी दिल्लीत बीएनएसएसच्या कलम १६३ (पूर्वीचं कलम १४४)अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत”, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
“जंतर-मंतर येथील निश्चित केलेल्या स्थळावर पूर्वपरवानगी घेऊन केल्या जाणाऱ्या निदर्शनांशिवाय दुसऱ्या इतर ठिकाणी निषेध मोर्चे, मिरवणुका, निदर्शने आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी आहे. तसेच २० जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार असल्याने सार्वजनिक सुरक्षितता, संरक्षित व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण सरकारी आस्थापनांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे दिल्ली पोलीस सर्व नागरिकांना आवाहन करत आहेत की त्यांनी कायद्याचा आदर करावा आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करावं”, असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
