नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर बेमुदत उपोषणावर बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
या कारवाईतून केंद्र सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही ‘सीजेपी’चे आंदोलन सुरूच राहिले. सरकारच्या या कृतीवर विरोधी पक्षांनी तीव्र टीका करत सरकारवर असहमतीचा आवाज दाबल्याचा आरोप केला.
वांगचुक यांना जंतर-मंतरवरून जबरदस्ती हटवल्यानंतर लगेचच ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा केली. वांगचुक यांच्याबरोबर ‘जेएनयू’च्या तीन विद्यार्थ्यांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही वांगचुक यांनी उपोषण कायम ठेवले असून उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर ते पुन्हा जंतर-मंतर येथे आंदोलनात सहभागी होतील, असा दावा ‘सीजेपी’ने केला. मात्र, वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करून केंद्र सरकारने त्यांचे जंतर-मंतरवरील उपोषण संपुष्टात आणले आहे.
आंदोलनाविरोधात कारवाई केली जात असली तरी, २० जुलै रोजी संसदेवरील मोर्चा काढण्याचा निर्धार ‘सीजेपी’ने केला असून जनतेने सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले आहे. ‘मी आजपासून बेमुदत उपोषण सुरू करत आहे. कुणीही मागे हटू नका. हे आंदोलन आणखी मोठे होईल’, असे दिपके यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यांनी देशभरात शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहनही केले. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनीही वांगचुक यांचे उपोषण सुरू असल्याचे सांगितले. २० जुलै रोजी संसदेवरील प्रस्तावित मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर पोहोचण्यापासून रोखले, रस्त्यावर ओढत नेले आणि मारहाण केली, असा आरोप दिपके यांनी केला. वांगचुक यांना येथून हलवल्यानंतरच मला आंदोलनस्थळी जाण्याची परवानगी देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. ‘जेएनयू’च्या विद्यार्थिनी नेहा बोरा यांनी आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून वांगचुक यांना हलवल्यानंतर पोलिसांनी इतर उपोषणकर्त्यांनाही हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, जंतर-मंतरवरील सभेदरम्यान अभिजीत दिपके यांच्यावर एका महिलेने शाईसदृश द्रव फेकल्याची घटना घडली.
वांगचुक यांना त्यांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवल्याचा आरोप सीजेपीने केंद्र सरकारवर केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केला. उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यांची प्रकृती खालावल्यास वैद्यकीय हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. दिल्ली पोलिसांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून त्यांना ताब्यात घेतले. ही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी कारवाई आहेह्ण, असा आरोप दास यांनी केला.
जंतर-मंतरवर काही वेळ तणाव
पोलिसांनी शनिवारी सकाळी वांगचुक यांना हटविण्याची कारवाई सुरू करताच आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी मानवी साखळी करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. पहाटे काही जण साध्या वेशात आले. सुरुवातीला त्यांनी स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगितले. नंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना रुग्णालयात हलवत असल्याचे सांगितले. आम्ही वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत थांबण्याची विनंती केली, मात्र त्यांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
दिल्ली पोलिसांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलिसांच्या निवेदनानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार डॉक्टर दररोज वांगचुक यांची वैद्यकीय तपासणी करत होते. शनिवारी सकाळी झालेल्या तपासणीत त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले.
मोर्चावर प्रश्नचिन्ह
सीजेपीने २० जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा कायम ठेवली असली तरी या मोर्चासाठी दिल्ली पोलिसांची अधिकृत परवानगी अद्याप घेण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने नवी दिल्ली जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. या आदेशानुसार संसद भवन, इंडिया गेट आणि आसपासच्या परिसरात चार किंवा अधिक व्यक्तींच्या जमावावर, विनापरवानगी मोर्चे व निदर्शनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
विरोधकांची टीका
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविण्याच्या कृतीचा काँग्रेसने निषेध केला आहे. केंद्रातील मोदी सरकारचा असत्य व हिंसा हाच आधार असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पोलिसांच्या कृतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाती प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेख यादव यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही सरकारवर टीका केली.
