नवी दिल्ली : जंतरमंतरवर अलोट गर्दी. ल्युटन्स दिल्लीतून केंद्र सरकारला आव्हान दिले गेले तेही जेन झी तरुणांनी. शेतकरी आंदोलनानंतर दिल्लीत इतका जबरदस्त माहोल पाहिला नसल्याची दिल्लीकरांची प्रतिक्रिया तितकीच बोलकी. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन रविवारी शिगेला पोहोचले. आता सगळे लक्ष सोमवारच्या संसदेवरील मोर्चाकडे लागले आहे.

नीट परीक्षेमधील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर २० जून रोजी सुरू झालेले हे आंदोलन रविवारी मोदी सरकारविरोधात रूपांतरीत झाल्याचे मानले जात आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारचा मोर्चा फक्त प्रधानांच्या विरोधात नव्हे तर मोदींच्या विरोधातही असेल असे वातावरण रविवारी जंतरमंतरवर होते. या मोर्चासाठी ‘सीजेपी’ने अजून परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. पण, मोर्चासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता जंतरमंतरवर जमण्याचे आवाहन ‘सीजेपी’ने केले आहे.

वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाच्या २१ व्या दिवशी, शनिवारी, पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरू झालेला जंतरमंतरवरील आंदोलकांचा ओघ किंचितही कमी झालेला नाही. शनिवारी रात्रभर जेन झी पाठीराख्यांची गर्दी होती, ती रविवारी आणखी वाढत गेली. जंतरमंतरवर पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. जेन झींना साथ देण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकही सहभागी झाले होते.  जंतरमंतरच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे.

दिल्ली पोलिसांचा फौजफाटा, जलद कृती दलाच्या तुकड्या आणि पोलिसांच्या व्हॅन्स विविध ठिकाणी तैनात केल्या होत्या. परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे सातत्याने देखरेख ठेवली जात होती.  त्यामुळेच पोलीस कारवाई होणार का, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. विशेषत: उपोषण करणार्‍या तिघांना ताब्यात घेतले जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.  ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके हेही बेमुदत उपोषणाला बसले आहेत.  दिल्लीत शेतकरी आंदोलनानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जंतरमंतरवर एकत्र आल्याचे चित्र प्रथमच दिसले. शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमांवर केंद्रित होते; मात्र यावेळी आंदोलन राजधानीच्या मध्यवर्ती भागात, सत्ताकेंद्राजवळ होत असल्याने त्याचे राजकीय महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.

घोषणाबाजीची साथ

आंदोलनस्थळी देशभक्तिपर गाण्यांनी वातावरण भारावून गेले होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तिरंगा अभिमानाने फडकवला जात होता. त्याचबरोबर ‘जय भीम’, ‘आंबेडकरांचा जयजयकार’ अशा घोषणाही दिल्या जात होत्या. या घोषणाबाजीत वादही रंगले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करणे देशविरोधी कसे, आमचे आंदोलन राष्ट्रविरोधी कसे, असे आंदोलनकर्ते प्रतिवाद करत होते.

शांतता राखण्याचे आवाहन

आंदोलनादरम्यान शांतता आणि शिस्त राखण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले. ‘‘आपण सर्व सुशिक्षित आहोत, कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या,’’असे आयोजकांकडून ध्वनिक्षेपकावरून सांगण्यात येत होते.

बेकायदा मोर्चावर कारवाई – दिल्ली पोलीस

नवी दिल्ली : भागात कलम १६३ म्हणजे जमावबंदी लागू असल्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शने किंवा सभा घेण्यास बंदी आहे. फक्त जंतर-मंतर येथे, आधी परवानगी घेऊनच आंदोलन करता येईल, असे पोलिसांनी निवेदनात नमूद केले आहे. सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बेकायदेशीर मोर्चे किंवा जमावात सहभागी होऊ नका आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

वृत्तवाहिन्यांचे दुर्लक्ष

* जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी)आंदोलनाला प्रतिसाद वाढत आहे. देशभरातील तरुण मोठ्या संख्यनेे येथे दाखल होत आहेत.

* देशभरातील वृत्तवाहिन्यांनी मात्र या आंदोलनाची विशेष दखल घेतलेली नाही. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर काही प्रमाणात वृत्तवाहिन्यांनी वार्तांकन केले.

* प्रामुख्याने समाजमाध्यम तसेच यूट्यूब वाहिन्यांवर ‘सीजेपी’च्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जात आहे.

‘चर्चेचे आश्वासन दिल्यास उपोषण सोडणार’

नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घ्यावी आणि संसदेच्या अधिवेशनात शिक्षणातील उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे. असे झाल्यास वांगचुक उपोषण सोडतील; अन्यथा ते उपोषण सुरूच ठेवतील, अशी माहिती त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी दिली.