सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर सोनम वांगचुक यांनी महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटला भेट दिली. महात्मा गांधी यांनी दाखवलेला सत्त्याग्रहाचा मार्ग हा आजही संदर्भहीन झालेला नाही. त्यांच्या मार्गावर चाललं तर यश मिळतंच हे पुन्हा एकदा दिसलं आहे असं सोनम वांगचुक म्हणाले आहेत. एवढंच नाही तर सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जे यश मिळालं त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. सोनम वांगचुक आणि त्यांची पत्नी गीतांजली या दोघांनीही राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
सोनम वांगचुक काय म्हणाले?
सगळ्या माध्यमांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. २६ दिवसांच्या उपोषणानंतर मी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर आंदोलनही आता संपलं आहे. यानंतर महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर आलो होतो. त्यांनी दाखवलेला मार्ग १०० वर्षांपूर्वी जेवढा उपयुक्त होता तेवढाच आताही ठरतो आहे. लोक म्हणतात की अशा पद्धतीच्या सरकारमध्ये अशा शासकासमोर अशी आंदोलनं चालत नाहीत. पण कुठलंही सरकार असो त्यांना जनतेचं ऐकावंच लागतं. याआधी महात्मा गांधींनी दाखवलेला उपोषणाचा, शांतता पूर्ण आंदोलनाचा मार्ग आम्ही लडाखमध्ये अनुभवला आहे. आता देशपातळीवरही मी हा अनुभव घेतला आहे, असं सोनम वांगचुक म्हणाले आहेत.
महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग आजही यश देतोच-सोनम वांगचुक
सोनम वांगचुक म्हणाले की मी देशातल्या तरुणांचं, जनतेचं आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो आहे. जो काही तोडगा निघाला तो चर्चेतूनच निघाला आहे. कुठल्याही प्रकारच्या लाठी चार्जने काहीही घडलं नाही. आम्ही शांततेचं आवाहन केलं होतं. तसंच आम्हाला जो काही त्रास झाला तो आम्ही सहन केला. विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालं याचं मनस्वी समाधान आहे असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी हे आजही संदर्भहीन झालेले नाहीत. त्यांनी १०० वर्षांपूर्वी दाखवलेल्या मार्गावर आजही चाललं तर यश मिळतंच असंही सोनम वांगचुक म्हणाले.
२६ दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही २८ जूनपासून उपोषण सुरु केलं होतं. २६ दिवसांनी त्यांनी ते उपोषण सोडलं. २२ जुलैच्या शनिवारी त्यांना आंदोलन स्थळावरुन दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर त्यांची खासगी रुग्णालयाची मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यांच्यावर २४ जुलैपासून मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी उपोषणही मागे घेतलं. आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
