Sonam Wangchuk Fast: नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र धार आली आहे. लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. वांगचुक यांचे वजन साडेआठ किलोने घटले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “माझं उपोषण सोडवण्यापेक्षा २० जुलै रोजी होणाऱ्या शांततापूर्ण संसद मार्चमध्ये सहभागी व्हा,” असे भावनिक आवाहन त्यांनी देशवासीयांना केले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या तरुण आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे. २८ जूनपासून सोनम वांगचुक जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत.
‘…पण हृदय अजून धडधडतंय’
सोशल मीडियावरून संवाद साधताना सोनम वांगचुक यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, “माझी तब्येत बिघडली आहे, हे खरंय. पण मी दोन-चार दिवसांत मरेन एवढीही वाईट परिस्थिती नाही. माझे वैद्यकीय अहवाल सध्या सामान्य आहेत. शरीरात प्रचंड अशक्तपणा आहे, पण मी आणखी काही दिवस लढा देऊ शकतो.”
उपोषण सोडल्यास सरकारला काय संदेश जाणार?
वांगचुक यांना उपोषण मागे घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नेते, हितचिंतक आणि नागरिकांकडून हजारो संदेश येत आहेत. काहींनी तर त्यांना सक्तीने अन्न भरवण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. यावर बोलताना वांगचुक म्हणाले, “मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? सरकारला हाच संदेश जाईल की, जनतेला उत्तर देण्याची काहीही गरज नाही. लोक उपोषणाला बसतात आणि निघून जातात, ही रीघ अशीच सुरू राहील. त्यामुळे मी मागे हटणार नाही.”
२० जुलैला ‘चलो संसद’ आंदोलन; थेट संसदेकडे मोर्चा
संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २० जुलै रोजी आंदोलकांनी ‘चलो संसद’ची हाक दिली आहे. याविषयी बोलताना वांगचुक म्हणाले, “तुम्ही सर्वांनी २० जुलैला मोठ्या संख्येने खासदारांसह दिल्लीत यावे. जेव्हा आपण हजारोच्या संख्येने हा प्रश्न संसदेच्या दारात मांडू, तेव्हा हा देश आणि आमचे प्रश्न सुरक्षित हातात आहेत, असा विश्वास मला मिळेल.”
“मागील ४० वर्षांपासून शिक्षण हा माझ्या आयुष्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज जेव्हा देशातील तरुण शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरला आहे, तेव्हा मी घरात शांत कसा बसू शकतो?” – सोनम वांगचुक, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
नेमक्या मागण्या काय आहेत?
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (CJP) ६ जूनपासून जंतर-मंतरवर या आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला आणि २८ जूनपासून ते स्वतः उपोषणाला बसले. त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- नीट (NEET-UG) पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
- लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये (Sixth Schedule) लडाखचा समावेश करण्यात यावा.
सरकारची संवेदनहीनता; आंदोलकांमध्ये तीव्र संताप
आंदोलनाला २५ हून अधिक दिवस आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला १९ दिवस पूर्ण झाले तरी केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिनिधी आंदोलकांशी बोलायला आलेला नाही. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “सरकारला आमच्याशी संवाद साधण्याचीही इच्छा नाही. त्यांनी वांगचुक यांना मरण्यासाठी सोडले आहे की काय, अशी भीती वाटते,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया दीपके यांनी दिली.
आता या आंदोलनात ‘आयसा’ (AISA) सारख्या विद्यार्थी संघटना, अनेक विरोधी पक्षांचे नेते, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि पर्यावरणवादी गट सामील झाले असून, २० जुलै रोजी होणाऱ्या संसद मार्चकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
