Sonam Wangchuk Real Story: लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. लडाखच्या अस्तित्वासाठी आणि पर्यावरणासाठी लढणारे सोनम वांगचुक नेमके कोण आहेत? ‘३ इडियट्स’ चित्रपटातील पात्र आणि वास्तव यात त्यांच्यात काय फरक आहे? जाणून घेऊया.
कोण आहेत सोनम वांगचुक?
५९ वर्षीय सोनम वांगचुक हे जागतिक स्तरावर लडाखचे पर्यावरण दूत आणि शिक्षण सुधारक म्हणून ओळखले जातात. लडाखला घटनात्मक संरक्षण मिळावे यासाठी ते सातत्याने शांततापूर्ण मार्गाने लढा देत आहेत. १९८८ मध्ये त्यांनी ‘सेकमोल’ (SECMOL – Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) या संस्थेची स्थापना केली. लडाखमधील शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणणे आणि स्थानिक तरुणांना शाश्वत जीवन कौशल्ये शिकवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
याशिवाय, पर्वतीय भागात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून त्यांनी ‘आइस स्तूप’ (Ice Stupa) या कृत्रिम हिमनदी तंत्रज्ञानाचा शोध लावला. हिवाळ्यात वाया जाणारे पाणी गोठवून शंकूच्या आकारात बर्फाचे मोठे स्तूप तयार केले जातात, जे उन्हाळ्यात वितळून शेतीसाठी पाणी पुरवतात.
गेल्या वर्षी झाली होती अटक, मार्चमध्ये ‘एनएसए’ मागे
यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये सोनम वांगचुक यांनी ‘लेह अपेक्स बॉडी’ (LAB) आणि ‘कार्गील डेमोक्रॅटिक अलायन्स’ (KDA) च्या माध्यमातून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षण मिळवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर लडाखमध्ये इंटरनेट बंदी घालण्यात आली होती आणि वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने मार्च २०२६ मध्ये त्यांच्यावरील ‘एनएसए’ मागे घेतला.
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो या सामाजिक उद्योजिका आणि शिक्षणतज्ज्ञ असून, त्या लडाखमधील ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज’ (HIAL) च्या सह-संस्थापक आहेत.
वांगचुक यांची राजकीय पार्श्वभूमी: वडील होते कॅबिनेट मंत्री
लडाखमधील ‘उलेतोक्पो’ या दुर्गम गावात जन्मलेले सोनम वांगचुक हे प्रसिद्ध नेते सोनम वांग्याल यांचे सुपुत्र आहेत. सोनम वांग्याल हे जम्मू-काश्मीरच्या राजकारणातील मोठं नाव होतं. सुरुवातीला ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि नंतर ‘काँग्रेस’शी जोडलेल्या वांग्याल यांनी १९७५ पासून जम्मू-काश्मीर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. विशेष म्हणजे, त्यांनीही आपल्या कार्यकाळात उपोषण केले होते. १९९८ मध्ये त्यांचे निधन झाले. वांगचुक यांच्या या आंदोलनाला त्यांच्या वडिलांच्या ऐतिहासिक संघर्षाची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे.
- ४२ वर्षांपूर्वी (१९८४ मध्ये) त्यांचे वडील सोनम वांग्याल यांनी लडाखला ‘अनुसूचित जमाती’चा (ST) दर्जा मिळण्यासाठी लेहमध्ये ५ दिवसांचे उपोषण केले होते.
- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः लेहला भेट देऊन, लेखी आश्वासन देऊन वांग्याल यांचे उपोषण सोडवले होते, मात्र वांगचुक यांच्या आंदोलनाला अद्याप केंद्र सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
‘३ इडियट्स’मधील रिअल लाईफ ‘फुन्सुक वांगडू’!
सोनम वांगचुक हे बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘३ इडियट्स’ मधील आमीर खानने साकारलेल्या प्रसिद्ध ‘फुंगसुक वांगडूं’ या पात्राचे रिअल लाईफ इन्स्पिरेशन (वास्तविक प्रेरणा) आहेत.
२०१८ मध्ये त्यांना आशियाचा नोबेल मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्काराच्या मानपत्रात नमूद केल्यानुसार, वांगचुक यांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. लडाखमधील अत्यंत खराब शिक्षण व्यवस्था, निरुपयोगी अभ्यासक्रम आणि परकी भाषा यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. वयाच्या १९ व्या वर्षी श्रीनगरच्या एनआयटी मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना, त्यांनी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि नापास होणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी शिकवणी वर्ग सुरू केले.
पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘सेकमोल’ची स्थापना केली आणि सरकारी परीक्षेत ९५% नापास होणाऱ्या लडाखच्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्यास सुरुवात केली. त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत मिळून शिक्षण पद्धती बालस्नेही आणि कृतीवर आधारित केली, ज्यामुळे तिथल्या मुलांचे भविष्य बदलले.
चित्रपट आणि वास्तवातला सर्वात मोठा फरक
‘३ इडियट्स’ चित्रपटात आमीर खानच्या पात्राकडे ‘फुंगसुक वांगडूं’ कडे तब्बल ४०० पेटंट्स असल्याचे दाखवले आहे. पण वास्तवात, सोनम वांगचुक यांच्या नावावर एकही (शून्य) अधिकृत पेटंट नाही.
वांगचुक यांनी त्यांचे जगप्रसिद्ध ‘आइस स्तूप’ आणि भारतीय लष्करासाठी बनवलेले ‘सोलर-हीटेड मिलिटरी टेंट’ (सौर ऊर्जेवर चालणारे तंबू) यांसाठी मुद्दाम पेटंट घेतलेलं नाही. आपले तंत्रज्ञान ‘ओपन-सोर्स’ म्हणजेच सर्वांसाठी खुले राहावे आणि जगभरातील दुर्गम भागातील समुदायांना त्याचा विनामूल्य फायदा घेता यावा, हा यामागचा त्यांचा उदात्त हेतू आहे.
