Sonam Wangchuk ghost statement: नीट पेपरफुटीप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. वांगचुक यांना देशभरातून पाठिंबा वाढत असून, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली जात आहे. पण, वांगचुक यांनी उपोषणावर ठाम राहत २० जुलै रोजीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. पण, या आंदोलनात भाग घेण्यास असमर्थ ठरल्यास, “मी भूत होऊन माघारी येईन”, असे वांगचुक जंतर मंतरवर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.
वांगचुक यांचे २० दिवसांपासून उपोषण
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यातून आंदोलनाची हाक दिली. देशभर आंदोलनानंतर दिपके दिल्लीत दाखल झाले. वांगचुक यांनी पुण्यातील आंदोनात हजेरी लावली होती, दिल्लीत आंदोलन दाखल झाल्यानंतर त्यांनी उपोषणाची हाक दिली. गेल्या २० दिवसांपासून वांगचुक उपोषण करत आहेत. देशभरातून राजकीय व्यक्ती, सिने कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांना समर्थन दिले आहे. दरम्यान, २० दिवसांच्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावली असून, चिंता व्यक्त केली जात आहे.
…तर मी भूत बनून माघारी येईन – वांगचुक
“मी २० जुलैपर्यंत कसाही जिवंत राहीन, जेणेकरुन मला तुमच्याबरोबर चलो संसदे मोर्चात सहभागी होता येईल. पण, २० जुलै रोजीचे मार्च यशस्वी झाले नाही, तर मी भूत बनून माघारी येईन”, असे सोनम वांगचुक जंतर मंतरवर आंदोलनकर्त्यांशी बोलताना म्हणाले. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक २० दिवसांपासून उपोषण करत आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे.
२० जुलैचे आंदोलन
येत्या २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनात पार्टीने देखील चलो संसद मार्चची हाक दिली आहे. या मार्चमध्ये देशभरातून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. “मी बाहेरुन कमजोर आहे, पण आतून खूप मजबूत, तुम्ही सर्वजण देखील आतून आणि बाहेरुन मजबूत आहात असा माझा विश्वास आहे. आपल्याला ही ऊर्जा २० जुलैसाठी हवीय. आपण शांततेत मार्च करु आणि लोकशाहीच्या मंदिरात आपल्या मागण्या मांडू”, असे वांगचुक पुढे म्हणाले.
वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता
वांगचुक यांना देशभरातून पाठिंबा वाढत आहे. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांनी वांगचुक यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. पण, उपोषण सोडण्यास न सांगता २० जुलैच्या मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वांगचुक यांनी केले. दरम्यान, वांगचुक यांनी उपोषण सुरु केल्यापासून त्यांचे ९ किलो वजन कमी झाले आहे. वांगचुक यांची सातत्याने वैद्यकीय तपासणी गरजेची असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची सूचना केली असून, केंद्र सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
