पीटीआय, नवी दिल्ली

‘नीट’ परीक्षा पद्धतीमधील कथित गैरव्यवहार आणि त्याची जबाबदारी स्वीकारण्याच्या मुद्द्यांवरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’तर्फे (सीजीपे) जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी १३ दिवस पूर्ण झाले.

विद्यार्थ्यांना समर्थन देत रविवारपासून उपोषण करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनाम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. वांगचुक यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ६० पर्यंत खाली आले असून रक्तदाबही कमी झाल्याची माहिती ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली. वांगचुक यांच्या प्रकृतीचे अधिक नुकसान झाल्यास त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा दिपके यांनी दिला. केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि आंदोलकांकडून अभिप्राय घेण्यासाठी अभिजीत दिपके यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी ‘कॉक्रोचसोबत चाय पे चर्चा’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. दुसरीकडे, ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या सहा विद्यार्थ्यांनीही आपले बेमुदत उपोषण स्वतंत्र मंचावरून सुरूच ठेवले आहे. उपोषणावर असलेल्या या विद्यार्थ्यांची प्रकृतीही चिंताजनक बनली असून, ‘जेएनयूएसयू’चे संयुक्त सचिव डॅनिश यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ६१पर्यंत आले आहे. तर आमीन आणि दीपक कुमार वर्मा या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

आंदोलनाला वाढता पाढिंबा

या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. भाकप (माले) लिबरेशनचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा घोषित करणार आहेत. यापूर्वी एम. ए. बेबी, वृंदा करात, डी. राजा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, ॲनी राजा, अंजली भारद्वाज आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांसारख्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे.