कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा झालेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा १८ वा दिवस आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती बऱ्यापैकी खालावली आहे. चोवीस तास त्यांच्या प्रकृतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. याबाबत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सीजेपीने मेडिकल बुलेटीनमध्ये काय म्हटलं आहे?

सीजेपीने मेडिकल बुलेटीन जारी केलं आहे. ज्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यांच्यावर २४ तास मेडीकल टीम लक्ष ठेवून आहे. १८ दिवसांत सोनम वांगचुक यांचं वजन आठ किलोंनी कमी झालं आहे. त्यांचं वजन आता ५७ किलो झालं आहे. मागील २४ तासांत त्यांचं वजन आणखी ४०० ग्रॅमने कमी झालं आहे. त्यांचा रक्तदाब 105/76, रक्तातील साखरेचं प्रमाण ८० एमजी/डीएल आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन ९७ टक्के इतकं आहे. हायड्रेशनची स्थिती बरी आहे असं सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की सोनम वांगचुक यांची शुद्ध हरपलेली नाही. पण त्यांच्या प्रकृतीवर आम्ही २४ तास लक्ष ठेवून आहोत.

अभिजीत दीपकेंची केंद्र सरकारवर टीका

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके म्हणाले की सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस आहे. पण सरकारने आमच्याशी चर्चेची कुठलीही तयारी दर्शवलेली नाही. केंद्र सरकारचं हे वागणं अत्यंत क्रूर आणि असंवेदनशील आहे. नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरुन आम्ही जे आंदोलन सुरु केलं आहे त्या आंदोलनाचा २६ वा दिवस आहे मात्र केंद्र सरकार आमच्याशी चर्चा करायला तयार नाही असंही दीपके यांनी म्हटलं आहे.

Sonam Wangchuk Hunger Strike day 18
अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारचं वागणं अत्यंत क्रूर आहे असं म्हणत टीका केली आहे. (फोटो-CJP-एक्स पेज)

दिल्ली उच्च न्यायालयाने जारी केली नोटीस

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस असून मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला आणि मोदी सरकारला नोटीस बजावली आहे. गुरुवारपर्यंत दिल्ली सरकारने आणि केंद्र सरकारने उत्तरादाखल याचिका दाखल केली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत संपूर्ण देशातून काळजी व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आपचे अरविंद केजरीवाल आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सरकारने तातडीने या विषयावर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.