पीटीआय, नवी दिल्ली

जोधपूर तुरुंगात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलेले लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती उत्तम असून, त्यांना जोधपूर ‘एम्स’कडून सर्वोत्तम उपचार सुविधा मिळत असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. वांगचुक यांच्या अटकेच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याबाबत किंवा त्यांची सुटका करण्याच्या प्रक्रियेबाबत आतापर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही, असे केंद्राची बाजू मांडणारे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता के. एम. नटराज यांनी न्या. अरविंद कुमार आणि न्या. पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाला सांगितले.

वांगचुक यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर, वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांच्या स्थानबद्धतेच्या निर्णयाचा आढावा घ्यावा या न्यायालयाच्या विनंतीवर काही प्रगती झाली आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही, काही प्रगती झाल्यावर मी त्यासंबंधीची माहिती दाखल करेन, असे नटराज यांनी सांगितले.

वांगचुक यांच्या प्रकृतीच्या मुद्द्यावर नटराज म्हणाले की, “आतापर्यंत तरी त्यांची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे. लडाखपेक्षा जयपूरमध्ये अधिक चांगल्या उपचार सुविधा आहेत. राजस्थानात ‘एम्स’ आहे, लडाखमध्ये त्यांना काहीही मिळणार नाही.” त्यावर, तुम्ही असे म्हणू शकत नाही, असे न्या. वराळे यांनी सुनावले. यानंतर वांगचुक यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पसवर बुधवारी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले.