Sonam Wangchuk Hunger Strike updates on Delhi Police actions : नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटेच कडेकोट पोलीस बंदोबस्तात सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान, जंतर मंतर येथे गोंधळ झाला असून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचं अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर सांगितलं. तसंच, पोलिसांनी अभिजीत दिपके यांनाही ताब्यात घेतलं होतं, आता त्यांना सोडण्यात आलं आहे. तर, जंतर मंतर येथे आल्यानंतर अभिजीत दिपके यांना अश्रू अनावर झाले.

वांगचुक आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत असलेल्या जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, पोलीस अधिकारी वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र वाद आणि शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं.

“उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडी गडबड झाली, परंतु पोलिसांनी कमालीचा संयम बाळगून ही कारवाई सुरक्षितपणे पार पाडली. आम्ही जंतर मंतर येथील आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शांततेने जागा रिकामी करावी”, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी एक्स पोस्टद्वारे दिली.

अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, अभिजीत दिपके त्यांच्या एका मित्राच्या घरी राहत होते. त्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे केला. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्यांना मारहाण करून ताब्यात घेतल्याची एक्सपोस्टही त्यांनी केली होती. परंतु, आता त्यांना सोडण्यात आलं आहे.

देशातील विविध परीक्षा-संबंधित अनियमिततांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा शनिवारी २१वा दिवस असता. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना जंतर मंतरवरून पोलिसांकडून हटवले जात आहे.

जंतर-मंतरवर लाठीचार्ज नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण

तर, कॉकरोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचाही दावा केला होता. मात्र, हा दावा दिल्ली पोलिसांनी खोडून काढला आहे. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, आंदोलकांवर कोणताही लाठीचार्ज करण्यात आलेला नाही आणि कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्यांची प्रकृती तसंच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन, सोनम वांगचुक यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथं कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज किंवा तसले काहीही झालेले नाही.”

अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया

“दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर येथून हलवलं आहे. येथे विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज करण्यात आलाय. मी फ्रेश होण्याकरता मित्राच्या घरी गेलो होतो. तिथेही मला पोलिसांनी मारून रोखून ठेवलं होतं. मला ताब्यात ठेवण्यात आलं होतं. मला आता सोडण्यात आलं असून जंतर मंतर येथे आम्हाला जाऊ दिलं जात नाहीय. देशभरातून जितके लोक हा व्हिडिओ पाहात त्यांना मी आवाहन करतो की, देशभरात आज शांततापूर्वक आंदोलन करायचं आहे. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने जंतर मंतर येथून हलवण्यात आलं आहे. मला मारहाण केली आहे, विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज केला आहे. आपल्या विभागात लोकांनी आंदोलन करायचं आहे. कोणताही नियम मोडू नका. विद्यार्थ्यांवरील हल्ला सहन केला जाणार आहे. सोनम वांगचुक २० दिवस उपाशी आहेत, त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उठवलं आहे”, अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली.

अभिजीत दिपके यांना अश्रू अनावर

दरम्यान, सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हलवल्यानंतर अभिजीत दिपके यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःहून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं.