दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरूनच सोनम वांगचुक हे देखील दिल्लीत बेमुदत उपोषणाला बसलेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पण तरीही सोनम वांगचुक यांनी अद्याप त्यांचं उपोषण सोडलेलं नाही.
या दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून दिल्लीत चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
या घडामोडीवरून सोनम वांगचुक यांनी एका पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी केंद्र सरकारकडे दोन महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि नीट पेपर फुटीच्या मुद्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची हमी मिळाल्यास आपण आपलं उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचं सोनम वांगचुक यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सोनम वांगचुक यांनी काय म्हटलं?
सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी हमी मिळावी. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह नीट पेपर फुटीच्या मुद्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची हमी मिळावी, अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे.
“पोलिसांची क्रूरता आणि बळाचा वापर होऊन देखील २० जुलै २०२६ रोजी झालेला मोर्चा अत्यंत शांततापूर्ण राहिला. लोकशाही मार्गाने निषेध करण्याचा त्यांचा संयम आणि निष्ठा संपूर्ण देशाने पाहिली. मला पूर्ण विश्वास आहे आणि या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कोणत्याही तरुण विद्यार्थ्याला सूडबुद्धीने केल्या जाणाऱ्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार नाही. योग्य आणि उत्तरदायी शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणं हा त्यांचा गुन्हा आहे का?”, असं सोनम वांगचुक म्हणाले आहेत.
‘…तर मी माझं उपोषण मागे घेईन’ : सोनम वांगचुक
“विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन मिळालं तर मी माझं उपोषण मागे घेईन. कारण सरकार केवळ माझ्याच नव्हे, तर लाखो भारतीय तरुणांच्या आशा-आकांक्षांकडेही लक्ष देत आहे, अशी मला खात्री पटेल. असं आश्वासन न मिळाल्यास, मला माझं उपोषण अनिश्चित काळासाठी सुरू ठेवावं लागेल. तसेच हे आंदोलन दडपण्यासाठी आणखी पोलीस बळाचा वापर केला जाणार नाही, अशीही मला आशा आहे”, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.
