स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषण सुरू होताच दिल्ली पोलिसांनी या ठिकाणची पाणी आणि स्वच्छता सुविधा शौचालय बंद केल्याचा आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’ या संघटनेने केला आहे.
‘CJP’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविवारी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत प्रशासनावर निशाणा साधला. त्यांनी लिहिले, “सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू करताच दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील स्वच्छता सुविधा बंद केल्या आहेत. तिथे ना पाण्याची सोय आहे, ना स्वच्छतेची. वांगचुक यांचे वय आणि प्रकृती पाहता पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती आम्ही वारंवार केली, पण पोलीस ऐकत नाहीत. इतर मूलभूत सुविधाही बंद केल्या जातील अशी आम्हाला भीती आहे. पोलिसांना नक्की काय करायचे आहे?”
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण का?
NEET पेपर लीक आणि स्पर्धा परीक्षांमधील इतर घोळांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘CJP’ गेल्या २० जूनपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित व्हावी. आणि लडाखला अधिक स्वायत्तता आणि तिथल्या पर्यावरणाला कायदेशीर संरक्षण मिळावे. या त्यांच्या मागण्या आहेत.
शासनाने या दोनपैकी कोणत्याही एका मागणीवर सकारात्मक पाऊल उचलले, तरी आपण उपोषण मागे घेऊ, असे वांगचुक यांनी आधीच स्पष्ट केले होते. परंतु, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले. उपोषणाला बसण्यापूर्वी वांगचुक आणि अभिजीत दिपके यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी, तरुण आणि नागरिक सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून येणाऱ्या अनेक शेतकरी नेत्यांना पोलिसांनी त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवल्याचा आरोपही अभिजीत दिपके यांनी केला आहे.
परीक्षांमधील गोंधळामुळे आणि फेरपरीक्षांमुळे आतापर्यंत २१ हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही या आंदोलकांकडून करण्यात आला असून, जंतरमंतरवर या विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक छोटे स्मारकही उभारण्यात आले आहे. CJP ने शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठी “प्रधान गो बॅक” मोहीमही सुरू केली आहे.
