पीटीआय, नवी दिल्ली

‘नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह अनेक आंदोलकांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत तीन विद्यार्थी उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. वांगचुक यांनाही प्रचंड शारीरिक वेदना होत असून त्यांचे वजन ८.५ किलोने घटले आहे.

आंदोलनाला मंगळवारी २५ दिवस पूर्ण झाले असून, वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा १७वा दिवस होता. आंदोलनाचे आयोजक असलेल्या ‘क्रॉकोच जनता पार्टी’ने (सीजेपी) प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालानुसार, वांगचुक यांच्या स्नायूंची झपाट्याने झीज होत असून तीव्र वेदना होत आहेत. रक्तदाबही कमी झाला आहे. उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर, ‘‘माझ्याकडे उपोषण सोडण्याची विनंती करू नका; सरकारला संवाद का साधत नाही, हे विचारा,’’ असे वांगचुक यांनी उत्तर दिल्याचे ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी सांगितले.

दरम्यान, उपोषणात सहभागी झालेल्या विद्यार्थी नेत्यांची प्रकृतीही खालावत आहे. ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या (एआयएसए) म्हणण्यानुसार, आंदोलन सुरू झाल्यापासून तीन विद्यार्थी कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. उर्वरित काही जण केवळ पाणी आणि मीठाच्या आधारावर उपोषण सुरू ठेवत आहेत. ‘एआयएसए’च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा, उत्तर प्रदेश अध्यक्ष मनीष आणि दिल्लीतील संशोधक आमीन यांचे वजन मोठ्या प्रमाणात घटले असून, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही धोकादायक पातळीवर आल्याचा दावा संघटनेने केला आहे.

आंदोलनाला पाठिंबा वाढला

आंदोलनाला विविध विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कलाकार आणि शिक्षणतज्ज्ञांचा पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचे आयोजकांनी सांगितले. याशिवाय १,८०० हून अधिक लेखक, कलाकार, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खुले पत्र प्रसिद्ध करून आंदोलनाच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चे समर्थन

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘चतुर’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले अभिनेते ओमी वैद्य यांनीही वांगचुक यांच्या समर्थनार्थ व्हिडीओ प्रसिद्ध केला. ‘‘त्यांचा मृत्यू होऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे. ते कोणत्या मुद्द्यासाठी लढत आहेत, हे प्रत्येकाने समजून घ्यावे,’’ असे आवाहन त्यांनी केले. वांगचुक यांच्या प्रकृतीकडे माध्यमे आणि नागरिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही वैद्य यांनी म्हटले.