दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं आहे. पोलिसांनी केवळ ट्रेन आणि मेट्रो बंद केल्या नाहीत तर आंदोलनकर्त्यांनाही ताब्यात घेतलंय. आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांनाच ताब्यात घेतल्याने इतर आंदोलक अधिक संतप्त आणि आक्रमक झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या या कृतीवर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही यावर संताप व्यक्त केला असून त्यांनी दिल्ली पोलीस आणि सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी यासंदर्भात आता एक व्हिडिओ पोस्ट केला.

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती

सोनम वांगचूक म्हणाले, काही वेळापूर्वी मला कळलं की दिल्लीत आज आंदोलनकर्ते, वकिल, सामान्य नागरिक आणि खासदारांना ताब्यात घेण्यात आलंय. काल मी शांततेचा आणि एकतेचा संदेश दिला होता. मला वाटत होतं की सर्वांत मोठ्या लोकशाही देशात शांततापूर्ण आंदोलनाला परवानगी दिली जाईल. पण आता अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखी देशात परिस्थिती आहे.”

…तर मी उपोषणाला बसेन

ते पुढे म्हणाले, “मी निवेदन करतो की आज सायंकाळपर्यंत ताब्यात घेतलेल्यांना सोडून द्यावं आणि प्रकरण मिटवावं. पुढच्या २४ तासांत जर ताब्यात घेतलेल्यांना सोडलं नाही तर मी ही शांतीपूर्ण आंदोलनाचा विचार करेन. मी आंदोलन, उपोषण किंवा पदयात्रा काढेन. पण मला वाटतं की सरकार चर्चेतून मार्ग काढेल.”

कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन होऊ नये यासाठी निमलष्करी दलाची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५,००० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मध्य दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खिळे टोचण्यात आले असून प्रत्येक चौकीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी होत आहे. पोलिसांनी आंदोलकांसह कंटेट क्रिएटर्सनाही ताब्यात घेतले आहे. तसेच यूट्यूबर ध्रुव राठी यालाही गुरुग्राममधील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले.

अभिजीत दिपके आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रातील तरूण अजिंक्य शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दलची घोषणा स्वतः दिपके यांनी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओतून केली.