दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटेच कडेकोट पोलीस बंदोबस्तात सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर अभिजित दीपके यांनी सोनम वांगचुक यांचं सरकारने अपहरण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अभिजित दीपके यांनी सोनम वांगचुक यांना सरकारने आदरपूर्वक वागणूक दिली नाही असंही म्हटलं आहे.

काय म्हणाले अभिजित दीपके?

सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन उचलून सरकारने खूप मोठी चूक केली आहे. सरकारने ज्या प्रकारे त्यांना उचललं त्यामुळे युवक संतापले आहेत. सोनम वांगचुक हे २१ दिवसांपासून उपोषण करत होते. त्यांचं १० किलो वजन कमी झालं होतं. अशा माणसाला उचलण्यासाठी तुम्ही स्ट्रेचरही आणलं नाही. पांढरे बेडशीट आणले गेले आणि एका माणसाला उचलण्यासाठी ७० ते ८० लोक आले होते. त्यांना इथून खेचत नेण्यात आलं. सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची काळजी सरकारला होती तर त्यांना सन्मानपूर्वक इथून का नेलं नाही? असा सवाल अभिजित दीपकेंनी केला आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अभिजित दीपके यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

सरकारने सोनम वांगचुक यांचं अपहरण केलं-अभिजित दीपके

सरकारने सोनम वांगचुक यांचं अपहरण केलं आहे आणि त्यांना रुग्णालयात बंद करुन ठेवलं आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलेलं नाही. सोनम सर म्हणत आहेत की मी उपचार घेणार नाही. मला जंतर-मंतरवर जाऊ द्या. पण पोलीस त्यांना जाऊ देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं आहे. असा गंभीर आरोप अभिजीत दीपकेंनी केला आहे. काहीतरी मोठं घडेल याची माहिती आम्हाला मिळत होती. काही पोलिसांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनीच आम्हाला याबाबत कल्पना दिली होती की काहीतरी मोठं घडू शकतं. आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की रात्रीतून काहीतरी कारवाई होईल. पण तसं घडलं नाही. शनिवारी सकाळी ७ च्या दरम्यान सोनम सरांना इथून नेण्यात आलं असंही अभिजित दीपकेंनी सांगितलं.

शनिवारी नेमकं काय घडलं?

मी अंघोळीसाठी मित्राच्या घरी गेलो होतो त्यावेळी साधारण सात वाजले होते. सात वाजून दहा मिनिटांनी मला इथल्या लोकांचा फोन आला की सोनम सरांना पोलीस उचलून नेत आहेत तू तातडीने इकडे ये. मी खाली उतरलो तर त्या इमारतीच्या खालीही पोलीस उभे होते. त्यांनी मला जंतर-मंतरवर येण्यापासून अडवलं. पोलिसांकडून मला बुक्के मारण्यात आले. त्यानंतर माझं तोंड दाबण्यात आलं आणि मला त्याच अवस्थेत बसवून ठेवलं. माझा फोनही पोलिसांनी हिसकावून घेतला असाही आरोप अभिजित दीपकेंनी केला आहे. पोलिसांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केली. साधारण अर्ध्या तासाने मला सोडण्यात आलं जिथे जायचं आहे तिकडे जा असं मला पोलिसांनी सांगितलं.