सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून २२ दिवसांहून अधिक काळ उपोषण आंदोलन केलं आहे. शनिवारी त्यांना जंतर-मंतर या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. मात्र सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं नाही. आता उपोषण सोडण्यासाठी सोनम वांगचुक यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. सरकारने तीन अटी मान्य केल्या तरच आपण उपोषण सोडू असं सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी तीन अटी ठेवल्या आहेत त्या मान्य केल्यास उपोषण सोडू असं वांगचुक म्हणाले आहेत.
सोनम वांगचुक यांची पोस्ट नेमकी काय?
सोनम वांगचुक यांनी एक चिठ्ठी लिहून ती पोस्ट केली आहे. ते म्हणाले, तुमच्यापैकी अनेकांनी मला हे विचारलं आहे की मी माझं उपोषण कधी सोडणार? मी आज म्हणजेच २० जुलैला माझं उपोषण सोडायला तयार आहे. पण माझ्या तीन अटी आहेत.
१) शिक्षण व्यवस्थेतील कमतरता, जसे की पेपर फुटणं, पेपर लीक होणं, विक्री होणं याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.
२) मी आणि कॉक्रोच जनता पार्टीचं नेतृत्व करणारे अभिजीत दीपके हे जर संसदेपर्यंत मोर्चा घेऊन पोहचलो तर विविध पक्षांच्या खासदारांनी आम्हाला हे आश्वासन द्यावं की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू.
३) माझी प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मला जर संसदेत जायची संमती दिली गेली नाही तर विविध पक्षांचे खासदार मला हा विश्वास देऊ इच्छित असतील की मी केलेल्या दोन अटींबाबत ते आवाज उठवीतल तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे.
सोनम वांगचुक यांच्या या तीन अटी आहेत. ज्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. आपल्या या तीन अटी मान्य झाल्या तर आपण आज उपोषण सोडू असं वांगचुक यांनी म्हटलं आहे.
२८ जूनपासून सोनम वांगचुक यांचं उपोषण
नीट पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन सुरु केलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं. शनिवारी म्हणजेच त्यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी पोलिसांनी त्यांना जंतर-मंतर इथून ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं आहे. ६ जूनला नीट या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. २८ जून पासून सोनम वांगचुक हे या आंदोलनात सहभागी होऊन उपोषणाला बसले आहेत. आता त्यांनी तीन अटी मान्य झाल्यास उपोषण मागे घेऊ असं म्हटलं आहे.
