गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनेही दिल्लीत आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनादरम्यानच कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली होती. ‘पीस बाँड’मधील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
आता याच ‘पीस बाँड’चा संदर्भ देत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत सूचक भाष्य केलं आहे. या पोस्टमध्ये सोनम वांगचुक यांनी त्यांचाच एक जूना व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांनी तरुण पिढीला उद्देशून एक महत्त्वपूर्ण आणि सूचक आवाहन केलं आहे.
“प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जायला हवं, पण गुन्ह्यासाठी नाही, तर एका उदात्त ध्येयासाठी”, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमकी कुणाकडे आहे? याची देखील आता चर्चा रंगली आहे. तसेच वांगचुक यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लडाखच्या ‘सहाव्या अनुसूची’ अंतर्गत संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही पुनरुच्चार केला.
सोनम वांगचुक यांनी काय म्हटलं?
“प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जायला हवं, गुन्ह्यासाठी नाही, तर एका उदात्त ध्येयासाठी. ‘पीस बॉण्ड’वर (शांतता करारनामा) स्वाक्षरी करण्याबाबत तुमचं काय मत आहे? जर तुम्हाला तसं करण्यास भाग पाडलं गेलं, तर तुम्ही त्यावर स्वाक्षरी कराल का? असा प्रश्न मला दिल्ली आणि मुंबईच्या माझ्या अलीकडील दौऱ्यात अनेक पत्रकारांनी विचारला होता”, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.
“जेव्हा चार वर्षांपूर्वी मी लडाखला ‘सहाव्या अनुसूची’ अंतर्गत संरक्षण देण्याच्या आपल्या निवडणूक आश्वासनांपासून सरकार मागे हटत असल्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं, तेव्हा मलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. तेव्हा मला घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं आणि अधिक दीर्घकाळ तुरुंगवासाची धमकी देण्यात आली होती. त्या वेळी मी माझ्या पॉडकास्टद्वारे तत्कालीन नायब राज्यपालांना उद्देशून एक व्हिडीओ संदेश दिला होता. त्यानंतर तो ‘बाँड पेपर’ घेऊन आलेला अधिकारी पुन्हा कधी परतलाच नाही. त्यामुळे तरुणांसाठी माझा हा सल्ला आहे की, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जायला हवं, गुन्ह्यासाठी नाही, तर एका उदात्त ध्येयासाठी.”, असं सोनम वांगचुक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
