Sonam Wangchuk on Parliament March : पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल १८ जुलै रोजी जंतर मंतर येथे उपोषण करत असताना बळजबरीने उचलून रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळे २० जुलै रोजीचा नियोजित संसदेवरील मोर्चा पुढे ढकलण्यात येणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी हा नियोजित मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मोर्चा म्हणजे भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ असेल असंही त्यांनी म्हटलंय. याबाबतचा संदेश त्यांनी त्यांच्या पत्नीमार्फत पाठवल्याची एक्स पोस्ट कॉकरोच जनता पार्टीने केली आहे.

“२० जुलै, स्वातंत्र्यासाठी दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत आणि अन्याय मुक्त भारत”, असा संदेश सोनम वांगचुक यांनी एका पेपरवर लिहिला आहे. पुढे असं लिहिलंय की, “पेपर लीकसारख्या अन्यायापासून स्वांतत्र्य आणि माझ्या बेयाकदेशीर अटकेच्या भीतापासून स्वातंत्र्य. भारताची दुसरं स्वातंत्र्य चळवळ, संसदेवर मोर्चा. कृपया हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करा. “

रुग्णालयाने सांगितलं की, वांगचुक यांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे डिहायड्रेशनची (शरीरातील पाणी कमी होण्याची) लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप शिफारस केलेल्या वैद्यकीय उपचारांसाठी संमती दिलेली नाही. एम्सचे एक डॉक्टर उपचार करणाऱ्या पथकात सामील झाले आहेत आणि ते सतत देखरेख व क्लिनिकल व्यवस्थापनासाठी उपलब्ध राहतील.

खासगी रुग्णालयात उपचारांची मागणी

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सफदरगंज रुग्णालयातील उपचारांवर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका करून सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे. “सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील माझा विश्वास उडाला आहे. रुग्णालयाने आम्हाला सांगितले की वांगचुक यांच्या पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत खाली आली आहे आणि ही बाब चिंताजनक व जीवघेणी असल्याचं म्हटलं आहे. तरीही, त्यांच्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये, त्यांनी सोयीस्करपणे नेमका आकडा वगळला आणि केवळ “पोटॅशियमची पातळी कमी होत आहे” असा उल्लेख केला. एका स्वतंत्र प्रयोगशाळेच्या चाचणीत ही पातळी ३.५ आढळली, जी सामान्य मर्यादेतच आहे,” असं त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.