नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. आज (२५ जुलै) अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील एका महिन्यापासून कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता. नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आदोलानंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या घडामोडीनंतर अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. तसेच ‘आता शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि देश चालवण्याची पद्धत आता तरी बदलेल’, अशी अपेक्षा सोनम वांगचुक यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे.
सोनम वांगचुक काय म्हणाले?
“आमच्या देशाच्या लोकशाहीची जी शक्ती आहे, ती शांततेमुळे आहे. विद्यार्थ्यांचा विजय निश्चितच झालेला आहे, पण आपल्या विजयातही विनम्रता असली पाहिजे. तसेच फक्त एका राजीनाम्यामुळे राष्ट्र बनत नसतं. आता शिक्षण व्यवस्थेत देखील बदल झाले पाहिजेत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत काही सुधारणा झाल्या पाहिजेत. मला अपेक्षा आहे की सरकार आता त्यांच्या कामातही सुधारणा करेल”, अशी अपेक्षा सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली.
“फक्त शिक्षण व्यवस्थेतच नाही, तर प्रशासन चालवण्याच्या पद्धतीत देखील सुधारणा केल्या पाहिजेत. प्रेमाने आणि संवादाने देश चालवला जाऊ शकतो. कोणावरही अन्याय होऊ नये, देश कायम सत्याच्या मार्गाने चालवला गेला पाहिजे. देशात जिथे कुठे भ्रष्टाचार असेल, तो भ्रष्टाचार संपवला पाहिजे. भारत कायम जगासाठी एक चांगलं उदाहरण, विश्वगुरु बनला पाहिजे”, अशी अपेक्षा सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर वांगचुक काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “हा लोकशाहीचा विजय आहे. थेट रस्त्यांवरून प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय झाला आहे. शांतता, संयम आणि चिकाटीचा हा विजय आहे. सीजेपी, तसेच ‘जेन झी’चे अभिनंदन आणि ज्यांनी भीती झुगारून देशाच्या कानाकोपऱ्यातून उठाव केला, सर्व नागरिकांचे आभार.” उत्तरदायित्वापासून, आता सुधारणांकडे” असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.
