Sonam Wangchuk reaction on CJP victory : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान डान्स केला. यामध्ये सौरव दाससहित अनेकजण नृत्य करताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही झाला. हीच जेनझीची भाषा असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं. मात्र, आता यावर पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि नीट पेपरफुटीप्रकरणी आवाज उठवणारे सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
सोनम वांगचुक म्हणाले, “आनंद साजरा करा. पण विजयासोबत नम्रताही असली पाहिजे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत. मोठ्या मनाने आणि प्रेमाने पुढे जाऊया.”
NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनातील प्रमुख चेहरा
NEET-UG प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात सोनम वांगचुक हे प्रमुख चेहरे म्हणून पुढे आले होते. त्यांनी जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला आणि बेमुदत उपोषण सुरू केलं. पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात हलवलं तरी ते आंदोलनाशी जोडलेले राहिले.
केंद्र सरकारने आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, तसंच प्रश्नपत्रिका फुटीमुळे आत्महत्या केलेल्या NEET विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई दिली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी २३ जुलै रोजी २६ दिवसांनी उपोषण सोडलं.
CJP वर टीका का होत आहे?
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि आंदोलन मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर लगेचच CJPच्या नेत्यांनी नाचत जल्लोष केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. या व्हिडिओंवरून अनेकांनी तीव्र टीका केली.
आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काही जणांनी हा जल्लोष असंवेदनशील असल्याचं म्हटलं. कारण, प्रश्नपत्रिका फुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या NEET विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे हे आंदोलन उभे राहिले होते. तसंच, काही राज्यांमध्ये आंदोलकांवर अद्याप पोलीस कारवाई आणि कायदेशीर खटले सुरू असताना अशा प्रकारे जल्लोष करणं योग्य नसल्याचंही अनेकांनी म्हटलं.
