Sonam Wangchuk North Korea Remark: नीट पेपर फुटीविरोधातील आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेल्या सोनम वांगचुक यांना १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी बळजबरीने जंतर-मंतरहून उचलले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. मात्र तिथे नेल्यानंतर पोलिसांनी आपल्याला कैद्यापेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप आता वांगचुक यांनी केला आहे. आपण जणू काय उत्तर कोरियात आलो आहोत का? असे वाटले, अशीही टीका त्यांनी केली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशात ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यावर निश्चित करावी आणि त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली. यासाठी त्यांनी सुरुवातीला देशभरात विविध ठिकाणी निदर्शने केली. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले. सोनम वांगचुक यांनी २७ जून रोजी या आंदोलनाला पाठिंबा देत बेमुदत उपोषण सुरू केले.

१८ जुलै रोजी उपोषणाच्या २१ व्या दिवशी सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांचा छळ केल्याचा एक व्हिडीओ आता वांगचुक यांनी समोर आणला आहे. वांगचुक म्हणाले, ते रुग्णालय नव्हते तर एकप्रकारची छावणी होती. त्या छावणीत मी कैदी होतो. कैद्यांपेक्षाही मला अतिशय वाईट परिस्थितीत तिथे डांबले गेले.”

“सफदरजंग रुग्णालयात प्रत्येक गोष्टीवर निर्बंध होते. मी खोलीबाहेर जाऊ शकत नव्हतो. आमच्या खोलीत एखादे चिटपाखरूही फिरकू शकत नव्हते. आम्हाला कुणालाही भेटण्याची परवानगी नव्हती. माझ्याबरोबर केवळ तीन नातेवाईकांना थांबण्याची परवानगी होती. मला मोबाइल किंवा लॅपटॉप वापरू दिला जात नव्हता. मी बाहेर चिठ्ठीही पाठवू शकत नव्हतो”, अशी माहिती सोनम वांगचुक यांनी दिली.

माझी पत्नी डॉ. गीतांजली यांनी युक्ती लढवून न्यायालयात धाव घेतली आणि गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मिळवली. पण त्यानंतरही सफदरजंग रुग्णालयातून मला बाहेर पडू दिले नाही. अनेक तास ताटकळत ठेवल्यानंतर बाहेर पडण्यासाठी मला आंदोलन करावे लागले. त्यावेळी रेकॉर्ड केलेले काही व्हिडीओ आता त्यांनी समोर आणले आहेत.

खासगी रुग्णालयालाही छावणीचे स्वरुप

वांगचुक पुढे म्हणाले की, आमच्यावरील संकट इथेच थांबले नाही. खासगी रुग्णालयालाही सरकारने छावणीचे स्वरुप दिले. माझ्या खोलीबाहेर पाच ते दहा पोलीस कर्मचारी होते. रुग्णालयाच्या खाली शेकडो पोलिसांचा वेढा होता. इथेही मला कुणाला भेटू दिले जात नव्हते. बाहेरचे कुणीही आत येऊ शकत नव्हते. इथे उत्तर कोरियासारखी परिस्थिती करण्यात आली होती, असा आरोप सोनम वांगचुक यांनी केला.

ताजी अपडेट – कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन स्थगित

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. सोनम वांगचुक यांनी हा युवा शक्तीचा विजय असल्याचे म्हटले.