Sonam Wangchuk on Ladakh Apex Body MHA Meeting: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण देण्याच्या मागणीवरून केंद्र सरकार आणि लडाखच्या प्रतिनिधींमध्ये नवी दिल्लीत ९ सप्टेंबरला झालेली बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत ठोस काहीच निष्पन्न न झाल्याने पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवंगत कॉमेडियन आणि अभिनेते जसपाल भट्टी यांच्या ‘फ्लॉप शो’ या मालिकेतील एक व्हिडीओ क्लीप शेअर करत त्यांनी सरकारला टोला लगावला. “सरकारी बैठकांचे फलित फक्त पुढच्या बैठकीची तारीख ठरवणे एवढेच असते,” अशी टीका वांगचुक यांनी यामाध्यमातून केली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाखमधील प्रतिनिधींसमवेत उपसमिती पातळीवर ही बैठक बोलावली होती. या बैठकीस ‘लेह ॲपेक्स बॉडी’ आणि ‘कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स’चे नेते उपस्थित होते. मात्र दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतरही हाती काहीच न पडल्याने लडाखच्या शिष्टमंडळाने तीव्र निराशा व्यक्त केली.

‘चार महिन्यांत परिस्थिती जैसे थे’

सोनम वांगचुक यांनी ‘एक्स’वरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले, “चार महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीपेक्षा या बैठकीत नवीन काहीच नव्हते. गृह मंत्रालयाने चर्चेसाठी कोणताही मसुदा तयार केला नव्हता. लडाखच्या प्रतिनिधींनी महिन्याभरापूर्वी सादर केलेल्या महत्त्वाच्या मागण्यांवर केंद्राकडून कोणतेही उत्तर आले नाही. इतकेच नव्हे, तर जोपर्यंत लोकनियुक्त विधानसभा अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत स्थानिक प्रशासन आणि जमीन हस्तांतरणाशी संबंधित धोरणांमध्ये बदल केले जाणार नाहीत, असे आश्वासनही देण्यात आले नाही.”

या बैठकीचा एकमेव निष्कर्ष म्हणजे केवळ ऑक्टोबर महिन्यातील पुढच्या बैठकीची तारीख ठरवणे हाच होता, असा टोला लावत वांगचुक यांनी जसपाल भट्टी यांच्या व्हिडीओचा संदर्भ जोडला. या व्हिडिओमध्ये एका बैठकीनंतर अधिकारी म्हणतात, “आज एक सर्वसंमत निर्णय झाला… पुढच्या बैठकीची तारीख ठरली!” वांगचुक यांच्या मते, लडाखच्या बैठकीची स्थितीही याहून वेगळी नव्हती.

चर्चेत कोणतीही प्रगती नाही – चेरिंग दोरजे

‘लेह ॲपेक्स बॉडी’चे सह-अध्यक्ष आणि माजी मंत्री चेरिंग दोरजे लाकरूक यांनीही बैठकीवर नाराजी व्यक्त केली. “गृह मंत्रालयाकडून आम्हाला एका ठोस मसुद्याची अपेक्षा होती, ज्यावर चर्चा करून आम्ही भूमिका स्पष्ट करू शकलो असतो. मात्र अधिकाऱ्यांनी २२ मे रोजी झालेल्या जुन्या बैठकीच्या इतिवृत्ताचीच पुनरावृत्ती केली. चर्चेत एक पाऊलही पुढे पडलेले नाही. आम्ही आमची नाराजी लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांना कळवली आहे,” असे दोरजे म्हणाले. आता पुढील बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कारगिल येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांच्याकडून आंदोलनाची हाक

लडाखशी संबंधित विषयांवर सरकारने एका आठवड्यात आश्वासन न दिल्यास १९ ते २४ सप्टेंबर दरम्यान आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा सोनम वांगचुक यांनी दिला आहे. यापूर्वी जून आणि जुलै महिन्यात नीट पेपरफुटीविरोधात सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण केले होते. तसेच २०२५ मध्ये लडाखमधील हिंसाचारानंतर एनएसएने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना सहा महिने शिक्षा भोगावी लागली होती.