Sonam Wangchuk on Hunger Strike Deal Allegations: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू केलेले उपोषण २६ व्या दिवशी संपवले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत मध्यरात्री उपोषण सोडल्यामुळे सोनम वांगचुक यांच्यावर काही जणांनी टीका केली. सोनम वांगचुक आणि केंद्र सरकार यांच्यात काही ‘डील’ झाले आहे का? असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. यावर आता सोनम वांगचुक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जंतर-मंतरवरून त्यांना बळजबरीने उचलून नेल्यानंतर त्यांच्याबरोबर काय झाले? याचीही माहिती त्यांनी व्हिडीओद्वारे दिली.
सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर २२ मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आणि त्याचबरोबर निराशाही व्यक्त केली. नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात महिनाभर उपोषण केल्यानंतरही मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का? असा प्रश्न वांगचुक यांनी उपस्थित केला.
वांगचुक यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या व्हिडीओचा संपादित भाग शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, २६ दिवसांच्या उपासमारीनंतर मला माझी प्रामाणिकता सिद्ध करण्याची गरज आहे का? तसेच त्यांनी त्यांच्या यूट्यूबवरील संपूर्ण व्हिडीओ पाहण्याचे आवाहन केले.
“माझे उपोषण प्रामाणिक होते, हे सिद्ध करण्याचे किंवा चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची गरज आहे का? उपोषण सोडल्यापासून अनेक लोक मला विचारत आहेत की, मी कुणाच्या प्रभावामुळे असे केले. केंद्रीय मंत्र्यांमार्फतच उपोषण का सोडले? यामागे कोणती डील झाली. २६ दिवस उपोषण केल्यानंतरही या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात”, अशा शब्दात वांगचुक यांनी नाराजी व्यक्त केली.
सोनम वांगचुक पुढे म्हणाले, “उपोषण सोडल्यानंतर द्रव्य पदार्थ घेतल्यामुळे माझ्या शरीरात काही प्रमाणात शक्ती आली आहे. पण ती मला अशा प्रकारे आरोपांना उत्तर देण्यासाठी खर्ची करावी लागत आहे. हे सांगतानाही मला खूप वेदना होत आहेत.” यानंतर त्यांनी सरकारबरोबर डील झाल्याचा आरोपही फेटाळून लावला.
मला जर सरकारबरोबर डील करायची असती. तर मला २६ दिवसांचे उपोषण करण्याची गरज पडली नसती. याआधीही अनेकांनी डील केल्या आहेत, पण त्यांनी अशाप्रकारे उपोषण केले आहे का? मी काय वातानुकूलित खोलीत बसून आलिशान वातावरणात करार करत होतो का? लडाखच्या थंडीतून येऊन मी दिल्लीच्या रणरणत्या उन्हात रस्त्याच्या कडेला २६ दिवस उपोषण केले, ते यासाठीच का? असा उद्विग्न सवाल वांगचुक यांनी उपस्थित केला.
राजीनामा आज ना उद्या होणारच
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना सोनम वांगचुक म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज ना उद्या होणारच आहे. केंद्राने राजीनामा घेतला नाही तर सरकारचीच बदनामी होत राहणार आहे. त्यामुळे मी या मागणीवर ठाम राहिलो नाही. माझ्या दृष्टीने जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वात जास्त महत्त्वाची आहे.
