कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन केले होते. यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा ही द्यावा लागला होता. याच आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवस उपोषण केले होते.
NEET पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर चर्चेत आलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आता कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, मी त्यांचं खूप जवळून निरीक्षण केलं आहे,” असा खुलासा वांगचुक यांनी केला आहे.
‘PGX Raw & Real’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत सोनम वांगचुक बोलत होते. दिल्लीतील आंदोलनात वांगचुक यांनी सलग २६ दिवस उपोषण केलं होतं. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटले होते आणि अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.
“राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात काही चुकीचं नाही”
मुलाखतीत बोलताना वांगचुक म्हणाले, “अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांनी भूतकाळात आम आदमी पार्टीसाठी काम केलं आहे. अनेक लोक मला विचारतात की यांच्या काही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का? मला स्वतःला असं वाटतं की, होय, त्यांच्या नक्कीच राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. मी त्यांचं खूप निरीक्षण केलं आहे. पण यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं आहे असं मला वाटत नाही.”
“राजकीय महत्त्वाकांक्षा असणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. कधीकधी मी अतिविचार करतो आणि मला वाटतं की आंदोलनात असणाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा नसाव्यात. तरीही मी त्यांना दोष देणार नाही. उलट ते अभ्यासू आणि चांगली माणसं आहेत. ते चांगल्या सामाजिक मुद्द्यांवर काम करत आहेत, याचा मला आनंद आहे.” – सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते
‘आंदोलनाची पवित्रता जपा’; वांगचुक यांनी दिला होता सल्ला
जंतर-मंतरवरील उपोषणाच्या काळातील आठवण सांगताना वांगचुक म्हणाले, “मी जितका वेळ त्यांच्यासोबत आंदोलनात घालवला, तितक्या वेळ मी त्यांना एकच सल्ला दिला होता, या आंदोलनाला अजिबात राजकीय स्वरूप देऊ नका. आंदोलनाची पवित्रता कायम राहिली तरच जनतेचा विश्वास टिकून राहतो. तुम्हाला पुढे जाऊन राजकारण करायचं असेल तर नक्की करा, पण सध्याच्या आंदोलनाला त्यापासून दूर ठेवा.” माझ्या या सल्ल्याचा मान राखत त्यांनी हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय ठेवले, याबद्दल वांगचुक यांनी समाधान व्यक्त केले.
अभिजीत दिपकेंचा जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेवरून सरकारला इशारा
NEET आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील शिक्षणाकडे वळवला आहे. हिंगोली तालुक्यातील लोहगाव आणि करंजाळा येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन त्यांनी तेथील दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क केवळ मोफत पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित ठेवता येणार नाही. त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे दिपके यावेळी म्हणाले.
शाळांमधील सुविधांचा अभाव पाहून प्रशासनावर ताशेरे ओढत दिपके म्हणाले, “ग्रामीण भागातील शाळांची ही दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे जर गुन्हा असेल, तर माझ्यावर एक नाही तर शंभर गुन्हे दाखल करा; पण प्रशासनाने तात्काळ शाळांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.”
