सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मागील वर्षी (२४ सप्टेंबर २०२५) वर्षी लडाखमध्ये एक मोठं आंदोलन केलं होतं. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, यासह आदी मागण्या वांगचुक यांनी केल्या होत्या. मात्र, या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. त्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सोनम वांगचुक हे काही महिने तुरुंगात देखील होते. लडाखमधील या हिंसाचाराच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.

या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना सोनम वांगचुक यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे आपला एन्काऊंटर होऊ शकतो, अशी भिती सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली. तसेच लडाखमधील हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार धरत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी वांगचुक यांनी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

सोनम वांगचुक यांनी काय म्हटलं?

लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सोनम वांगचुक यांनी लडाखमधील हिंसाचाराच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

जर हा अहवाल प्रसिद्ध केला नाही, तर ही चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र ‘जन-न्यायाधिकरण’ स्थापन करण्याचा इशारा वांगचुक यांनी दिला. लडाखमधील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात काही जणांच्या मृत्यूच्या घटनेला सोनम वांगचुक यांनी अमित शाह यांना जबाबदार धरलं आहे.

सोनम वांगचुक म्हणाले की, “आज मी लडाखमधून सांगतो की, अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. लडाखमध्ये जे काही घडलं त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. स्थानिक तरुणांच्या विरुद्ध सुरक्षा दलांनी ‘एके-४७’ सारख्या शस्त्रांचा वापर केला आणि त्यानंतर त्या तरुणांनाच राष्ट्रविरोधी ठरवलं”, असा आरोप वांगचुक यांनी केला.

सोनम वांगचुक यांनी काय भिती व्यक्त केली?

“त्यांनी आधी मला तुरुंगात टाकलं, आता माझा एन्काऊंटर होऊ शकतो. काही लोक मला म्हणाले की, ‘तुझा एन्काऊंटर केला जाऊ शकतो. पण तसं घडलं तर घडू द्या. जेणेकरून सर्वांचे डोळे उघडतील आणि देशाला जाग येईल”, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याबाबत आपली भूमिका मांडताना सोनम वांगचुक म्हणाले की, मी या मागणीचं समर्थन करतो. मात्र लडाखबाबत राहुल गांधींच्या मौनावरही सोनम वांगचुक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.