Sonam Wangchuk Hunger Strike Warning Abhijeet Dipke: भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका टिप्पणीवर उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी गमतीने सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने पाहता पाहता मोठे रूप घेतले. सोशल मीडियावर त्यांना भारतातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक असा पाठिंबा मिळाला. त्यानंतर आता या व्हर्च्युअल पक्षाने दिल्लीतील जंतर मंतर येथील मैदानात आपल्या पहिल्या आंदोलनाची हाक दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज आंदोलन होणार आहे.
तत्पूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेहून दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. साध्या वेशातील काही पोलिसांनी दिपके यांना अज्ञातस्थळी नेल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी इशारा दिला की, जर अभिजीत दिपके आणि पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला अटक झाली तर ते ४२ दिवसांच्या उपोषणाला बसतील.
सोनम वांगचुक यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. याबरोबर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “शनिवारी मी तुम्हा सर्वांना भेटायला लडाखहून दिल्लीला भेटायला येत आहे. जंतर मंतरवर तुमची भेट घेईन. तथापि, जर उद्या कोणत्याही कारणास्तव तुम्हाला अटक झाली, तर मला एक असे पाऊल उचलण्यास भाग पडेल, जे उचलण्याची माझी इच्छा नाही. जर कुणाचीही अटक झाली तर मी यावेळी सहा आठवड्यांसाठी म्हणजेच ४२ दिवसांसाठी उपोषणावर जाईल.”
दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावला गेला आहे. पोलिसांनी जंतर मंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत.
अभिजीत दिपकेंच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याचे कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स हँडलवर जाहीर करण्यात आले आहे. सर्व आंदोलकांनी आता थेट जंतर मंतरवर भेटावे, असे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.
शांततेत आंदोलन करण्याचे दिपकेंचे आवाहन
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक ३० वर्षीय अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेहून भारतात परतले. आपले आंदोलन शांततेने आणि प्रेमाने करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिपके म्हणाले, मी भारतात आलो आहे. आपण लवकरच भेटू. आपल्या हातात तिरंगा आणि पुस्तक घेऊन यायला विसरू नका. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना फूल द्या आणि त्यांचे कौतुक करा. आपल्याला ही चळवळ शांततेने आणि प्रेमाने पुढे न्यायची आहे.
