गेल्या २१ दिवसांपासून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत होता. मात्र, १८ जुलै रोजी सकाळी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यामुळे सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, जेव्हा पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा पोलीस साध्या वेशात आले होते, असा आरोप केला जात आहे. तसेच सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात नेल्याचाही आरोप करण्यात येत आहे. यावरून आता सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची एवढीच काळजी होती, तर मग त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी साध्या वेशातील पोलीस का पाठवले होते? तुम्ही सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात का नेलं?’, असे सवाल गीतांजली आंग्मो यांनी केले आहेत.
गीतांजली आंग्मो काय म्हणाल्या?
“त्यांनी (सरकारने) सांगितलं की सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना काळजी वाटली. त्यामुळे त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांचा हा दावा चुकीचा आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती व्यवस्थित होती. एक दिवसाआधीचे रिपोर्ट नॉर्मल होते. पोटॅशियमची पातळी ४.३ होती. पण जर तुम्हाला खरोखरच सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची काळजी होती, तर तुम्ही त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी साध्या वेशातील पोलीस का पाठवले होते?त्यांना एवढ्या निर्दयीपणे आणि बळजबरीने उचलून का नेलं? तुम्ही साधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी देखील येऊ शकले असते ना, किंवा आम्हाला सांगू शकला असतात ना. जर तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी असती तर तुम्ही असे वागले नसतात”, अशा शब्दांत गीतांजली आंग्मो यांनी संताप व्यक्त केला.
“आरोग्याचं कारण देऊन सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याचा फक्त एक बहाणा होता. मात्र, खरं म्हणजे त्यांना याची भिती वाटत होती की जर सोनम वांगचुक यांनी २० जुलैचा मोर्चा केला, तर दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरातून लाखो लोक त्यांच्याबरोबर सामील होतील. त्यामुळे हे रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला”, असा आरोपही गीतांजली आंग्मो यांनी केला.
खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयाऐवजी कुटुंबाच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सोनम वांगचुक यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. तसेच सोनम वांगचुक यांना सध्या दिल्या जाणाऱ्या उपचारांवर कुटुंबाचा विश्वास नसल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. मात्र, सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची कुटुंबाची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
