सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतलं आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. यानंतर आता त्यांचं उपोषण कधी सुटणार हा प्रश्न कायम होता. मात्र आता सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अगमो यांनी पीटीआयला याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

गीतांजली अंगमो यांनी नेमकं काय सांगितलं?

गीतांजली यांनी पीटीआयला हे सांगितलं की, जर सरकारमधील नेत्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्यांना हे आश्वासन दिलं की पावसाळी अधिवेशनात विद्यार्थ्यांचा प्रश्न आणू आणि शिक्षण पद्धतीबाबत उत्तरदायी राहू तर सोमवारी म्हणजेच २० जुलैला सोनम उपोषण सोडायला तयार आहेत. सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील २० दिवसांमध्ये त्यांचं वजन १० किलो खालावलं आहे. दरम्यान गीतांजली यांनी ही मागणीही केली होती की सोनम वांगचुक यांना एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल केलं जावं. ही मागणी घेऊन त्या दिल्ली उच्च न्यायालयातही पोहचल्या होत्या. मात्र त्यांना याबाबतची संमती मिळाली नाही. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. आता सोनम वांगचुक यांच्याशी जर सरकारमधल्या नेत्यांनी चर्चा केली आणि योग्य आश्वसन दिलं तर ते २० जुलैला म्हणजेच सोमवारी उपोषण सोडायला तयार आहेत असं गीतांजली यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाने काय सांगितलं?

रविवारी संध्याकाळी सफदरजंग रुग्णालयालने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतचं हेल्थ बुलेटीन जारी केलं. यात हे सांगण्यात आलं की त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण रक्ताच्या पॅरामीटर्समध्ये चढ-उतार होत आहेत. दीर्घ काळ उपवास केल्याने शरीरावर जो ताण पडला आहे त्यामुळे हे होतं आहे. आम्ही त्यांच्यावर योग्य लक्ष ठेवून आहोत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असं रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर २४ तास लक्ष ठेवणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यांच्या रक्त चाचण्या आणि इतर चाचण्या केल्या जात आहेत असंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

२८ जून पासून सोनम वांगचुक यांचं उपोषण

कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन सुरु केलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरु केलं. या उपोषणाचा आजचा २२ वा दिवस होता. शनिवारी म्हणजेच त्यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी पोलिसांनी त्यांना जंतर-मंतर इथून ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं आहे. ६ जूनला नीट या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. २८ जून पासून सोनम वांगचुक हे या आंदोलनात सहभागी होऊन उपोषणाला बसले आहेत.