ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR प्रक्रियेतील घोळाच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन होतं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. अभिजीत दिपकेंनी चलो जंतर-मंतरचा नारा दिला आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी होणार नाहीत.धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचे दोन चेहरे होते, एक होता तो अर्थातच अभिजीत दिपके यांचा तर दुसरा चेहरा होता सोनम वांगचुक यांचा. सोनम वांगचुक यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आपण आंदोलनात का सहभागी होणार नाही ते सांगितलं आहे.

काय म्हणाले आहेत सोनम वांगचुक?

नमस्कार सगळ्यांना, मी सध्या लडाखच्या डोंगर रांगामध्ये उभा आहे. आता थंडीचा मोसम येईल आणि आम्ही सुरुवात करतो आहोत प्रयोगांची. पाण्यासाठी आर्टिफिशियल लेक्स आणि ग्लेशियर्ससाठी काम करत आहोत. तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं आहे की आम्ही कुठे आहोत आणि शांत का? दिल्लीतल्या संघर्षात मी का नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. मी दाद देतो दिल्लीत जमलेल्या सगळ्या तरूणांना जे राजकीय संकटाच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि त्यांची एकजूट त्यांनी दाखवून दिली आहे. पण राजकीय संकटांप्रमाणेच नैसर्गिक संकटंही येत आहेत.फैज यांच्या अंदाजात सांगायचं झालं तर और भी गम है जमाने में मोहब्बत के सिवा, या मै कहूं और भी गम हैं सियासत के सिवा राहते और भी है, बस एक राहत के सिवा. जी मदत हवी आहे, दिलासा हवा आहे तो आपल्याला नैसर्गिक संकटांपासूनही हवा आहे त्यामुळे मी आंदोलनात आलेलो नाही.असं सोनम वांगचुक म्हणाले.

महात्मा गांधींचा संदेश विसरू नका-सोनम वांगचुक यांचं आवाहन

सोनम वांगचुक पुढे म्हणाले आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांना मी सर्वांना माझ्या शुभेच्छा पाठवतो आणि विविध गटांच्या नेत्यांना एकजूट राहण्याचे आणि सामंजस्य राखण्याचे आवाहन करतो. मी जेन-झी मधील माझ्या सर्व मित्रांनाही सर्व परिस्थितीत पूर्ण शांतता राखण्याचे आवाहन करतो. ही बापूंकडून मिळालेली एक भेट होती, जी मी जूनमध्ये जंतर मंतरवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो; मला आशा आहे की आपण बापूंना निराश करणार नाहीत. चूल पेटवण्यासाठी एका माचिसच्या काडीची गरज असते. एकदा चूल पेटली की जेवण तयार होतं, शिजतं. मी त्या आंदोलनात सहभागी झालो होतो आता मला या ठिकाणी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक समस्यांना तोंड द्यायचं आहे. पण माझ्या शुभेच्छा कायमच तुमच्या पाठिशी आहेत.”