पक्षाचे मुखपत्र ‘काँग्रेस संदेश’चा आणखी एक पराक्रम 

‘काँग्रेस संदेश’ हे काँग्रेसचे मुखपत्र. ते पुन्हा एकदा गंभीर चुकीसाठी चर्चेत आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसाऐवजी चक्क ‘जयंती’च्या शुभेच्छा दिल्याचे त्यात प्रसिद्ध झाले आहे.

हयात असलेल्या व्यक्तीच्या जन्मदिनास वाढदिवस म्हणतात आणि मृत व्यक्तीच्या जन्मदिनास ‘जयंती’ म्हणतात. पण ‘काँग्रेस संदेश’ने आपल्या हयात अध्यक्षांनाच थेट ‘जयंती’च्या शुभेच्छा देऊ केल्या. निमित्त होते ते पक्षाच्या वर्धापनदिनाचे. वर्धापनदिनानिमित्त सोनियांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे वृत्त काँग्रेस संदेशमध्ये आहे. पण ते प्रसिद्ध करताना ‘७०वी जयंती मौके पर सोनियाजी को बधाई’ असे शीर्षक दिले गेले. वृत्तामध्येही सगळीकडे ‘जयंती’ असाच शब्दप्रयोग आहे. विशेष म्हणजे ‘संपादकीया’मध्ये मात्र ‘जन्मदिन’ असा नेमका शब्द वापरला आहे.

डॉ. गिरीजा व्यास या काँग्रेस संदेशच्या संपादिका आहेत, तर जयराम रमेश व सलमान खुर्शीद हे संपादक मंडळाचे सदस्य आहेत.