पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये संसदेला तोंड द्यायची हिंमत नसल्याने त्यांनी हिवाळी अधिवेशन लांबवले असा आरोप आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. या आरोपाला केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी उत्तर दिले आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपांना काहीही अर्थ नाही असे जेटली यांनी म्हटले आहे. आजवर हिवाळी अधिवेशन लांबवण्याचे प्रकार काँग्रेसनेही अनेकदा केले आहेत असे प्रत्युत्तरही जेटली यांनी दिले आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार  केंद्राचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होते आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालते. आता नोव्हेंबर महिन्याची २० तारीख उलटून गेल्यावरही हिवाळी अधिवेशन सुरू झालेले नाही. त्याचमुळे सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींमध्ये संसदेला तोंड देण्याची हिंमत नसल्याची टीका केली होती. याच टीकेला अरूण जेटली यांनी उत्तर दिले आहे.

आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशन जाणीवपूर्वक लांबवले आहे असा आरोप त्यांनी केला. ज्यानंतर अरूण जेटलींनी या आरोपांना उत्तर दिले आहे. काँग्रेसने २०११ मध्येही अशाचप्रकारे हिवाळी अधिवेशन लांबवले होते. डिसेंबर महिन्यात हिमाचल आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांसाठी आम्ही हिवाळी अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करतो आहोत असे अरूण जेटली यांनी म्हटले आहे. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा अधिवेशन पुढे ढकलण्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत यात टीका करण्यासारखे काहीही नाही असेही जेटली यांनी म्हटले आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसकडे कोणताही मुद्दा उरलेला नाही म्हणून ते आमच्यावर टीका करत सुटले आहेत. यूपीएच्या १० वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. मात्र जेव्हापासून भाजपचे सरकार देशावर आले आहे भ्रष्टाचार झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करत आहेत असेही जेटली यांनी स्पष्ट केले.