नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘बिलाँगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आपण प्रकाशित करणार असल्याची घोषणा हार्पर कॉलिन्सने शुक्रवारी केली. हे पुस्तक भारतात १० नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. त्यामुळे पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने भारतातील प्रकाशनातून माघार घेतल्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता संपली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय आवृत्ती आधी ठरल्याप्रमाणे पेंग्विन रँडम हाऊसच्या अल्फ्रेड ए. नॉफ यांच्या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित होणार आहे.

पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (पीआरएचआय) हे आत्मचरित्र प्रकाशित करणार होते. मात्र, हस्तलिखितातील काही भागांमध्ये संपादकीय बदल करण्यावरून लेखकाच्या प्रतिनिधींशी मतभेद झाले. त्यावर उपाय न निघाल्याने पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुस्तक प्रकाशित करण्यापासून माघार घेतली.

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही वाद निर्माण झाला होता. काही काँग्रेस नेत्यांनी सरकारचा दबाव आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच मोदी सरकारच्या काळात चीनने भारतीय भूभागावर मिळवलेल्या कथित ताब्याशी संबंधित काही भाग पुस्तकातून वगळण्यासाठी पेंग्विनवर दबाव आणला गेल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, ‘पेंग्विन’ने गेल्या आठवड्यात ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष निवेदनात कोणताही बाह्य् दबाव नसल्याचे स्पष्ट केले होते.

पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कंपनी उत्सुक होती आणि ते मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला होता, असेही कंपनीने म्हटले होते. काही बदलांवर लेखकाच्या प्रतिनिधींशी सहमती झाली, तर काही मुद्द्यांवर लेखकाची भूमिका मान्य करण्यात आली. मात्र, एका विशिष्ट मुद्द्यावर अंतिम सहमती होऊ शकली नाही, असे ‘पीआरएचआय’ने स्पष्ट केले होते. गोपनीयतेच्या अटींमुळे या मुद्द्याचे स्वरूप जाहीर केले गेले नाही.