नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राचे भारतात प्रकाशन न करण्याचा निर्णय ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने घेतल्याची माहिती ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मिळाली आहे.
‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ला हस्तलिखिताच्या एका भागामध्ये काही संपादकीय बदल करायचे होते, तसेच काही भाग वगळायचा होता. मात्र यास पुस्तकाच्या लेखिका सोनिया गांधी यांनी नकार दिला. १० नोव्हेंबर रोजी हे पुस्तक प्रकाशित होणार होते. याची घोषणा सर्वप्रथम पेंग्विन रँडम हाऊसचा विभाग असलेल्या अमेरिकेतील ‘अल्फ्रेड ए. नॉफ’ या प्रकाशन संस्थेने केली होती. नॉफने असेही सांगितले होते की, या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत एक लाख प्रती छापल्या जाणार आहेत.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने नॉफ आणि सोनिया गांधींचे प्रतिनिधी डेव्हिड गॉडविन यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला. मात्र यावर भाष्य करण्यास ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव श्रीनागेश यांनाही सोनिया गांधींच्या हस्तलिखितातील बदलांबाबत विचारण्यात आले, परंतु तेही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाही.
नॉफने यापूर्वी या पुस्तकाचे वर्णन ‘जगातील सर्वात प्रमुख महिला नेत्यांपैकी एकाचे वेधक आत्मचरित्र’ असे केले. हे पुस्तक प्रेम, कुटुंब आणि भारत या अत्यंत आकर्षक देशाची हृदयस्पर्शी कथा सांगते, असेही नॉफने म्हटले.
पेंग्विन इंडिया या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे आता अनेक भारतीय प्रकाशक या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उत्सुक आहेत. ‘हार्पर कॉलिन्स’ हे भारतात पुस्तक प्रकाशित आणि वितरित करण्याबाबतचा करार अंतिम करण्याच्या टप्प्यावर असल्याचे समजते.
प्रकाशनाचे यापूर्वीही वाद…
– माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे आत्मचरित्रही ‘पेंग्विन इंडिया’ने प्रकाशित केलेले नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या पुस्तकाची ‘हार्ड कॉपी’ दाखविल्याबद्दल वाद निर्माण झाला होता.
– प्रसिद्ध चित्रकादंबरीकार जो साको यांच्या ‘द वन्स अँड फ्युचर द रायट’ या मुझफ्फरनगर दंगलींवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन ‘पेंग्विन इंडिया’ने जूनमध्ये रद्द केले होते. या पुस्तकातील मजकुराबाबत प्रकाशकाने लेखकाकडे काही आक्षेप उपस्थित केले होते.
