काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मनरेगाचं नाव बदलण्यावरुन मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. २० वर्षांपूर्वी जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा संसदेत सर्वसहमतीने मनरेगाचा कायदा संमत करण्यात आला होता. हे एक क्रांतिकारी पाऊल होतं. त्यामुळे कोट्यववधी ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना रोजगार मिळाला. खासकरुन गरीब, वंचित आणि अतिगरीब वर्गाला आधार मिळाला. मनरेगाने लोकांना कायदेशीर रोजगाराचा अधिकार दिला. महात्मा गांधी ग्राम स्वराज्यचं स्वप्नपुढे नेण्यास मदत केली. मात्र सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला.

सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला-सोनिया गांधी

सोनिया गांधी यांनी आरोप केला की मागच्या ११ वर्षांपासून मोदी सरकारने मनरेगा कमकुवत करण्याचं काम केलं. कोविडच्या कठीण काळात मनरेगाची योजना गरीबांसाठी संजीवनी असल्याचं सिद्ध झालं. मात्र नुकताच मोदी सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला. सरकारने फक्त महात्मा गांधींचं नाव हटवलं नाही पण मनरेगाचा विचार आणि आचार दोन्ही मारलं. कुणाचाही सल्ला न घेता कुठलीही सल्ला मसलत न करता मनमानी करत त्यांनी मनरेगाचं नाव बदललं.

आता दिल्लीत बसून ठरवलं जाणार का की कुणाला कसा रोजगार मिळेल?

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की दिल्लीमध्ये बसून हे ठरवलं जाणार आहे का? की कुणाला, किती आणि कसा रोजगार मिळेल? जमिनीच्या वास्तवापासून दिल्लीत बसलेले लोक दूर आहेत. मनरेगा ही कुठल्याही पक्षाची योजना नाही तर लोकांच्या हितासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजनेला कमकुवत करण्यात आलं आणि त्यानंतर सरकारने कोट्यवधी शेतकरी, मजूर आणि भूमिहीन ग्रामीण गरीबांवर केलेला हल्ला आहे असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

आम्ही सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहोत-सोनिया गांधी

सोनिया गांधी म्हणाल्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत. २० वर्षांपूर्वी गरीब भावांना-बहिणींना रोजगार मिळावा म्हणून आम्ही लढा दिला होता. आता आज या काळ्या कायद्याच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मी आणि माझ्या काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत असाही विश्वास सोनिया गांधींनी व्यक्त केला.