केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या निर्णयासह आणखी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिल्यानंतर देशभरातून ज्ञानेश कुमारांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांमधील अंतर्गत मतभेदांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची दिल्लीत लवकरच बैठक होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यासंदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीआधी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश आणि केंद्र सरकारविरोधातील रणनीती निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसने मंगळवारी मतचोरी विरोधातील संघर्ष अधिक तीव्र केला आहे. काँग्रेसच्या या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मुद्यांसह देशभरातील आणखी काही विषयांवर देखील चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, याच बैठकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्यात नितीश कुमार यांच्यावरून मतभेद दिसून आले आहेत.

इंडिया आघाडीतून नितीश कुमार यांच्या बाहेर पडण्यावरून सोनिया गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्यात मतभेद पाहायला मिळाले आहेत. नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते, असा दावा सोनिया गांधी यांनी केला, तर नितीश कुमारांना इंडिया आघाडीतून बाहेर पडू द्यायला नको होतं, अस मत दिग्विजय सिंह यांनी मांडलं आहे. सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडंनी हे वृत्त दिलं आहे.

काय घडलं?

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह यांनी बैठकीत मत मांडताना म्हटलं की, “नितीश कुमार यांना आपण इंडिया आघाडीतून बाहेर पडू द्यायला नको होतं. जर ते इंडिया आघाडीत राहिले असते, तर आज राजकीय परिस्थिती वेगळी असती.”

दिग्विजय सिंह यांच्या या मतावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देत त्यांची भूमिका मांडली. सोनिया गांधी यांनी म्हटलं की, “नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची आणखी उशिरा साथ सोडली असती, तर अधिक नुकसान झालं असतं. त्यामुळे नितीश कुमार वेळेत बाहेर पडले आहेत. त्यांना शेवटी तिकडे जायचंच होतं. नितीश कुमार हे सतत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत होते”, असं सोनिया गांधींनी म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या बैठकीत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे आक्रमक; ५ मोठ्या मागण्या केल्या

-मतदार यादीत होणाऱ्या प्रत्येक मोठ्या बदलाची संपूर्ण आकडेवारी (डेटा) सार्वजनिक करण्यात यावी.

-ज्या मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत, त्यांना त्याची पूर्ण माहिती आणि दाद मागण्याची योग्य संधी मिळावी.

-राजकीय पक्षांना मतदार यादी आणि त्याशी संबंधित आवश्यक डेटा वेळेत व सोप्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावा.

-जिथे गंभीर त्रुटी किंवा विसंगतींचे पुरावे समोर येतील, तिथे स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी.

-निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचा डेटा आणि निर्णयांमध्ये अशी पारदर्शकता असावी, जेणेकरून कोणत्याही पक्षाला ‘माहिती लपवली जात आहे’ असं म्हणण्याची संधी मिळणार नाही.