scorecardresearch

संतापानंतर ‘सीबीएसई’कडून आक्षेपार्ह प्रश्न मागे; सोनिया गांधींचा तीव्र विरोध; लोकसभेत विरोधकांचा सभात्याग

‘‘महिलांना दिलेले स्वातंत्र्य हेच विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचे मूळ आहे.

no need to speak to me through media Sonia Gandhi at CWC meet
संग्रहीत छायाचित्र

सोनिया गांधींचा तीव्र विरोध; लोकसभेत विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील ‘अवज्ञा करणाऱ्या पत्नी’ या आशयाच्या महिला अवमानकारक ‘आकलन उताऱ्या’वर लोकसभेत सोमवारी संताप व्यक्त झाला. सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यानंतर ‘सीबीएसई’ने तो आक्षेपार्ह उतारा मागे घेतल्याची आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचे पूर्ण गुण देण्याची घोषणा केली.   

लोकसभेत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वादग्रस्त उताऱ्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, मुस्लीम लीग आदी विरोधी पक्षांनी निषेध नोंदवत सभात्याग केला.

दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील संबंधित उतारा आणि त्यावरील प्रश्न ‘सीबीएसई’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा असल्याने तो मागे घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे पूर्ण गुण दिले जातील, असे ‘सीबीएसई’ने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. लोकसभेत या ‘प्रश्ना’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर ‘सीबीएसई’ने संबंधित प्रश्न आक्षेपार्ह ठरवला. हा आक्षेपार्ह उतारा ११ डिसेंबर रोजी झालेल्या ‘सीबीएसई’च्या दहावीच्या इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत होता.

‘‘महिलांना दिलेले स्वातंत्र्य हेच विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचे मूळ आहे. महिलांना मिळालेल्या मुक्तीमुळे पालकांचा पाल्यांवरील अधिकार संपुष्टात आला आहे,’’ आदी पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थन करणारी वाक्ये या उताऱ्यात आहेत. हा उतारा रविवारी समाजमाध्यमांवर चर्चिला गेला होता आणि त्यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले होते.

या उताऱ्यातील वाक्येच्या वाक्ये आक्षेपार्ह आहेत. पत्नी पतीचे ऐकत नसल्याने त्यांची मुले आणि नोकर बेशिस्त झाले आहेत, असे वाक्य त्यात आहे. हा संपूर्ण उताराच अवमानकारक विचारांनी भरलेला आहे. पुरुषप्रधान विचारांचे समर्थन करणाऱ्या या साहित्याचा विरोध करीत असल्याचे सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितले. हे उतारा शिक्षणाचा आणि परीक्षांचा निकृष्ट दर्जा स्पष्ट करते. हे सशक्त समाज बनवण्याच्या पुरोगामी विचारांना हरताळ फासणारे आहे, असा संताप सोनिया यांनी व्यक्त केला.  

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी रविवारी ट्वीट करून उताऱ्यातील उल्लेखांना विरोध केला. महिलाविरोधी उताऱ्याच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो, यावर विश्वास बसू शकत नाही. भाजपची सरकारे महिलांबद्दलच्या या प्रतिगामी विचारांना पाठिंबा देतात, हे यावरून स्पष्ट झाले अन्यथा ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश झाला नसता, असे ट्वीट प्रियंका यांनी केले.

केंद्रीय शिक्षणमंत्री आणि सीबीएसईने हा प्रश्न तातडीने मागे घ्यावा आणि माफी मागावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशीही करावी. विविध अभ्यासक्रमांतील स्त्री-पुरुष भेदभाव करणाऱ्या संदर्भांचा आढावा घेऊन त्यात दुरुस्ती केली जावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली.

उताऱ्यातील उल्लेख…

’महिलांना दिलेले स्वातंत्र्य हेच विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचे मूळ आहे.

’महिला मुक्त झाल्यामुळे पालकांचा पाल्यांवरील अधिकार संपुष्टात आला.

’महिला आपल्या पतीचा मार्ग स्वीकारूनच आई म्हणून मुलांना आज्ञाधारक बनवू शकते.

’पत्नी पतीचे ऐकत नसल्यामुळेच मुले आणि नोकर बेशिस्त झाले आहेत. 

विद्यार्थ्यांना पूर्ण गुण

संबंधित उतारा सीबीएसईच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नव्हता. त्यामुळे संबंधितांकडून आलेल्या अभिप्रायाच्या आधारे हा विषय तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्या शिफारशीनुसार उतारा आणि त्यावरील प्रश्न वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याचे पूर्ण गुण दिले जातील, असे ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonia gandhi fierce opposition opposition resignation in lok sabha akp

ताज्या बातम्या