नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधत असलेले राहुल गांधी यांचे ‘भारत जोडो’ यात्रेतील छायाचित्र शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर, सोनिया व राहुल गांधी यांच्या एकत्रित सहभागाचा कर्नाटकसह अन्य राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती लाभ होऊ शकेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चर्चेकडे भाजपलाही लक्ष द्यावे लागले असून ‘यात्रेमध्ये सोनिया फक्त अर्धा तास सहभागी झाल्या होत्या, या यात्रेमुळे निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच, केंद्रातील भाजपचे नेतेही करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यात्रा काढून काँग्रेस घाम गाळत असल्याचे दिसत असले तरी, त्याचा काँग्रेसला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाही,’ असा दावा भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी केला.

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकमध्ये असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी मंडय़ा जिल्ह्यातून यात्रा पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेआठ वाजता सोनिया गांधी यात्रेमध्ये सहभागी झाल्या, सुमारे एक किमी अंतर चालल्यानंतर, राहुल गांधी यांनी सोनियांना सकाळच्या टप्प्यातील उर्वरित यात्रा कारमधून पूर्ण करण्याची विनंती केली. काही वेळानंतर, सोनियांनी पुन्हा दोन किमीची पदयात्रा केली. यात्रेमध्ये सोनिया गांधी जेमतेम अर्धा तास सहभागी होणार होत्या; पण त्यांनी दोन तास पदयात्रा केली, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

खरगे अनुपस्थित

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवार मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकमध्ये असून ते सोनिया व राहुल यांच्यासह ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी होतील, असे सांगितले जात होते. मात्र, शुक्रवारी खरगे यात्रेमध्ये दिसले नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi participation in bharat jodo yatra congress viral sonia rahul gandhi photo ysh
First published on: 07-10-2022 at 00:02 IST